• सामाजिक कार्यकर्ते हबीब शेख यांची मागणी
चंद्रपूर : कोरपना तालुक्यात नारंडा, मांडवा व विरुर गाडेगाव हे प्राथमिक केंद्र आहेत. या केंद्रांवर कोव्हिड १९ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविली जात असून नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसते. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य उपकेंद्र अस्तित्वात असलेल्या बिबी, खिरडी, दुर्गाडी, माथा, येरगव्हान, लखमापुर, बाखर्डी, भोयगाव, नांदगाव व अंतरगाव येथे लसीकरण मोहीम तातडीने सुरू करावी अशी मागणी बिबीचे सामाजिक कार्यकर्ते हबीब शेख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच, तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी देखील भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून ही मागणी अवगत केली. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हबीब शेख यांची मागणी लोकहितकारी असून तातडीने या मागणीच्या अनुषंगाने तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत प्रशासन सकारात्मक पाऊले उचलतील असे आश्वस्त केले आहे.
सद्या कोरपना तालुक्यात आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी असल्याने तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र असलेल्या गावात लसीकरण सुरू झाले पाहिजे. जर येत्या ७ दिवसात ही मागणी पूर्ण न झाल्यास आरोग्य केंद्रासमोर नागरिकांना सोबत घेत कायदेशीर मार्गाने आंदोलन केले जाईल.
– हबीब शेख, सामाजिक कार्यकर्ते, बिबी