माथेफिरूने केला गाढ झोपेत असलेल्या  7 नातेवाईकांवर कुऱ्हाडीने हल्ला ;  दोघांचा जागीच मृत्यू , 5 गंभीर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

यवतमाळ : गाढ झोपेत असलेल्या आई, बहिणीसह 7 नातेवाईकवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यात दोघे जागीच ठार झाले तर 5 गंभीर जखमी झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याच्या कारला देव येथे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोकुळ राठोड (वय 23) असं प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव आहे. हा तरुण कारला देव येथे आपल्या आईसोबत राहतो. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण गाढ झोपेत असताना गोकुळने घरातील धारदार कुऱ्हाड काढली आणि घरात झोपूण असलेले आत्याचे पती वसंता राठोड यांच्यावर सपासप वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आपली आई सुनिता राठोड हिच्यावर वार केला असता बहीण अश्विनीला जाग आली. अश्विनीने गोकुळला रोखण्याचा प्रयत्न केला. पण यात अश्विनीसुद्धा गंभीर जखमी झाली.

यानंतर गोकुळने शेजारी राहत असलेल्या आपल्या भावकीतील नेरचंद आडे यांच्या घरी मोर्चा वळविला. ते घराच्या अंगणात झोपून असल्याचे पाहून त्यांच्यावरसुद्धा गोकुळने कुर्‍हाडीने सपासप वार केले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.याशिवाय काका संजय राठोड यांनाही गंभीर जखमी केले. संबंधित तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याने हे हत्याकांड घडल्याचं बोललं जात आहे.

गावकऱ्यांनी माथेफिरू युवकाला पकडण्याचा प्रयत्न केला. काहींनी पुसद ग्रामीण पोलिसांना माहिती कळविली. ग्रामीणचे ठाणेदार बोडखे यांनी तत्काळ आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून आरोपीला जेरबंद केले. उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांनीसुद्धा माहिती मिळताच घटनास्थळ गाठले व चौकशी केली. नामदेव भाऊराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.