गडचिरोली : जिल्ह्याच्या आणि राज्याच्या पूर्व टोकावरील भामरागड तालुक्यात अजूनही नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. छत्तीसगड सीमेकडील आदिवासी गावांमध्ये जाण्या-येण्यासाठी रस्तेच नसल्यामुळे त्यांना पायवाटेने प्रवास करावा लागत आहे. परिणामी रुग्णांना उपचारासाठी आणायचे असेल तरी अनेक किलोमीटर चालत यावे लागले. मेटेवाडा गावातील अशाच एका १२ वर्षीय मुलीला कावड करीत तब्बल ३० किलोमीटर पायी चालून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. यावरून मूलभूत सोयीसुविधा आणि आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत ही गावे किती मागे आहेत, याची कल्पना येते.
स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही मेटेवाडासारख्या कित्येक आदिवासी गावांमध्ये विकासाचा सूर्य उगवलेलाच नाही. सोमवारी दुपारी छत्तीसगड सीमेवरील त्या राज्याच्या हद्दीत येणाऱ्या मेटेवाडा येथील मुरी पांडू पुंगाटी (१२) या मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला खाटेची कावड करून ३० किलोमीटर चालत लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणावे लागले.
छत्तीसगडच्या सीमेतील नारायणपूर जिल्ह्यातील ओरछा तालुक्यातील मेटेवाडा या गावात १२ आदिवासी घरांची वस्ती आहे. ते लोक गवताचे झाडू बनवून लाहेरी व भामरागडच्या बाजारात अत्यल्प मोबदल्यात विक्री करून गुजराण करतात. लाहेरीपासून त्यांच्या गावाचे अंतर ३० किलोमीटर आहे. यात मोठे डोंगर-दऱ्या आहेत. त्या परिसरातील नागरिक दैनंदिन वापरातील वस्तूंसह सर्व प्रकारच्या खरेदीसाठी लाहेरीच्याच बाजारात येत असतात. एवढेच नाही तर उपचारासाठीही लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय जवळचे दुसरे उपचार केंद्र नाही. लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाला वाटत नाही. परिणामी अनेक वर्षांपासून या भागातील लोक परिस्थितीला तोंड देत जगत आहेत.