दोन कोटींच्या जमीन खरेदीवरून जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटीचे संचालक अडचणीत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

आमसभेत गाजणार जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटी संचालकांचे जमीन खरेदी प्रकरण

चंद्रपूर : तब्बल दोन कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्यावरून जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटीचे संचालक अडचणीत सापडले आहेत.याची दुय्यम निबंधकाकडे तक्रार करण्यात आली आहे. एक-दोन दिवसांत याची पोलिसांत तक्रार केली जाणार असल्याची माहिती आहे.

हे प्रकरण चर्चेत असतानाच आता सोसायटीमध्ये करण्यात आलेली कर्मचाऱ्यांची पदभरतीच्या संचालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधीच सोसायटीत कर्मचारी आहेत. गरज नसतानाही भरतीची ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे यातही काहीतरी गैरव्यवहार झाल्याची शंका सदस्यांना आहे. दरम्यान, येत्या २६ सप्टेंबर रोजी आमसभा आहे. या आमसभेत हे सगळेच प्रकरण गाजणार असल्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मिळून या सोसायटीची स्थापना फार पूर्वी केली. जवळपास दोन हजार ३०० सभासद या संस्थेचे आहेत. या कालावधीत या सोसायटीने स्वतःची वास्तू घेतली. तेथे सोसायटीचे कार्यालय आहे. त्यातील काही गाळ्यांची विक्री करण्यात आली. सोसायटीचे कामकाज बघण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारेच आजवर कारभार पाहिला जात होता.

मात्र, काही महिन्यांआधीच संचालक मंडळाने लिपिक, लेखापाल आणि परिचराची पदे भरली. ही पदे भरताना कोणतीही जाहीरात काढण्यात आली नाही. सोसायटीत या कर्मचाऱ्यांची तशी गरज नव्हती. गरज नसतानाच या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे यात काहीतरी घोळ करण्यात आल्याची शंका सभासदांना आहे. हे प्रकरण समोर असतानाच आता जमीन खरेदीचे प्रकरण समोर आले. चंद्रपूर-नागपूर मार्गावर सोसायटीने बारा हजार स्ववेअर फूट जागा खरेदी करण्यात आली. ही जमीन दोन हजार शंभर रुपये दराने खरेदी करण्यात आली.

विशेष म्हणजे जमीन खरेदीची परवानगी घेण्यात आली नाही. केवळ काही सभासदांच्या सूचना असल्याचे सांगून ही जमीन खरेदी केल्याचे संचालक मंडळाचे म्हणणे आहे. याची तक्रार राजू मुरकुटे या सदस्याने दुय्यम निबंधकाकडे केली आहे. तक्रारीत संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणीही केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या जमीन खरेदीचे हे प्रकरण आता पोलिसांत देण्याच्या हालचाली काही सदस्यांकडून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता संचालकांना चांगलाच घाम फुटला आहे. दरम्यान, येत्या २६ सप्टेंबर रोजी सोसायटीची आमसभा होणार आहे. या आमसभेत चांगले वादंग माजणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.