मक्तेदारी संपली; “प्रयास’ सार्वजनिक जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला पाठपुरावा

घुग्घुस : माजी खासदार व केंद्रीय मंत्री यांच्या शासकीय निधीतून येथील वॉर्ड क्रमांक सहामध्ये प्रयास सभागृहाचे २०१७ मध्ये बांधकाम करण्यात आले होते. सदर सभागृह नागरिकांच्या खुल्या भूखंडावर बांधण्यात आले असून, ही जागा शासनाला दान करण्याच्या संस्थेच्या हमीपत्रावर ५ फेब्रुवारी २०१६ मध्ये परवानगी देण्यात आली.

मात्र, शासकीय सभागृहाचा वापर एका राजकीय पक्षा तर्फे करण्यात येत असल्याची माहिती नागरिकांनी काँग्रेस पक्षाकडे केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र काढले. त्यामुळे या सभागृहावरील मक्तेदारी संपली असून, आता ते सार्वजनिक वापरासाठी उपयोगात येणार आहे.

शासकीय निधीतून बांधण्यात आलेले प्रयास सभागृह निःशुल्क नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सय्यद अनवर यांनी पालकमंत्री विजय वड्डेटीवार व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली होती. या दर तक्रारीची दखल घेत सभागृहाची चौकशी करण्यात आली. याप्रसंगी संस्था चालकांनी कुठल्याही नागरिकांकडून पैसे घेण्यात येत नसल्याचे सांगतिले. त्यानंतर या बाबतच्या माहितीचे पत्रक जिल्हाधिकारी यांनी राजूरेड्डी यांना दिले आहे.

सभागृहात कार्यक्रमाकरिता पैसे घेण्यात आले असलेल्या नागरिकांनी लिखित स्वरुपात तक्रार, पावतीसह काँग्रेस कार्यलयात जमा करावी. यापुढे सभागृह कुठल्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी नसून, केवळ जनतेसाठी आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा मोफत लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे.