• आतापर्यंत 23 जणांना झाली अटक
• नऊ जणांची जामिनावर सुटका
• वणी खुर्द गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त
चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वणी खुर्द या दुर्गम गावात जादूटोणा करित असल्याच्या संशयावरून गावातील काही लोकांनी वृद्ध महिला व पुरूषाला दोरांने बांधून मारहाण केल्याप्रकरणी आज मंगळवारी (24 आॅगस्ट) ला आणखी दहा जणांना अटक करण्यात आली असून या घटनेत आतापर्यंत 23 जणांना अटक झाली आहे. काल सोमवारी चौघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर 9 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. जखमी वृध्द महिला व पुरूषांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.सर्वांची प्रकृती सध्या चांगली आहे.
सोमवार पर्यंत तेराआरोपींना अटक करण्यात आली तर या घटनेत अन्य सहभागी आरोपींकरीता अटकसत्र सुरू करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली जिवतीचे सहा.पोलिस निरिक्षक संतोष अंबीके यांनी पोलिसांचे पथक तयार करून रात्री १० जणांना पुन्हा ताब्यात घेतले आहे. त्या आरोपींमध्ये दत्ता धोंडीराम तेलंगे(३५),भागवत गोपाळ शिंदे(३४),विठ्ठल किशन पांचाळ(३७),वैजनाथ संभाजी शिंदे(५५),विठ्ठल जगन्नाथ शिंदे(३५),किरण चंद्रमनी कराळे(२५), साहेबराव सटवाजी पौळ(३५), मनोहर परशुराम भिसे(४५),केशव श्रीहरी कांबळे(३०), दिनेश अंकुशराव सोनकांबळे (२३),यांचा समावेश आहे. याघटनेत आतापर्यंत 23 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर नऊ आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
शनिवारी घडलेल्या घटनेनंतर गावात शांतता भंग होऊ नये यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समिती व पोलिसांच्या वतीने समाज जागृती करण्याच काम सुरू आहे. सध्या गावात शांततेच वातावरण असून चोख पोलिस बंदोबस्त आहे.जखमी वृध्द महिला व पुरूषांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.सर्वांची प्रकृती सध्या चांगली आहे.
आमदार सुभाष धोटे यांची गावाला भेट
शनिवारी वणी खुर्द गावात घडलेल्या घटनेचे गांभिर्य ओळखून या क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी गावाला भेट देऊन नागकांशी व पिडीत कुंटुबियांच्या नातेवाईकांशी चर्चा केली.अंधश्रध्देवर विश्वास ठेऊन वृद्ध महिला व पुरूषांना मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी मात्र निर्दोष लोकांना या प्रकरणात गोवू नये. नागरिकांनी कुठल्याही अंधश्रध्देवर विश्वास ठेऊ नये. गावात शांतता ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
अटकेच्या भितीपोटी अनेकांनी सोडले गाव!
वणी खुर्द गावात अंधश्रध्देच्या विचाराला बळी पडून वृद्ध महिला व पुरूषांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या काही लोकांना पकडण्यासाठी पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे.आतापर्यंत २३ अटक करण्यात आले आहे.अजुनही तपास सुरूच आहे. यात सहभागी लोकांना अटक करण्यासाठी पोलिस पथक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात आपली नावे समोर येतील व पोलिस अटक करतील या भितीने अनेकांनी घर सोडले सोडल्याची माहिती समोर आली असून काही नागरिक जंगलात झोपत असल्याचे गावकरी सांगत आहे.