जादूटोणा, भानामतीच्या घटनांना ब्रेक लावण्यासाठी “ऑक्शन प्लॅन”

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जादूटोणा, भानामतीच्या संशयावरून चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या अमानुष घटनांमुळे राज्य सुन्न झाले. अशा घटना कशा रोखता येतील, यासाठी कृती आराखडा तयार केल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी हा कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पालकमंत्री वडेट्टीवार या कृती आराखड्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. गावागावांत जादूटोणाविरोधी कृती दलाच्या स्थापनेसह डोक्यातील भूत काढण्यासाठी प्रबोधनावर विशेष भर कृती आराखड्यात देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात गावकऱ्यांनी आठजणांना खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर नागभीड तालुक्यात दोन, चंद्रपूर आणि अलीकडेच चिमूर तालुक्यात अंगणवाडी केंद्रात पूजेचे लिंबू फेकण्याचा प्रकार घडला. अशा घटनांवर आळा घालण्याच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी कृती आराखड्यासाठी पुढाकार घेतला.

असा आहे कृती आराखडा
जादूटोणा व भानामतीमुळे ग्रस्त गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जादूटोणाविरोधी कृती दल तयार करणे. यात सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, दलित प्रतिनिधी, मागासवर्गीयांचा प्रतिनिधी, महिला मंडळ प्रतिनिधी असा सात ते आठ जणांचा समावेश असेल. या कृती दलाला एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाची रूपरेषाही सादर केली आहे. ३० ते ३५ वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारी मंडळी हे प्रशिक्षण देतील. नंतर हे कृती दल जिल्ह्यातील सर्व गावांत तयार करण्यात येईल. गावागावांत सामूहिक प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.