देशभरातील औष्णिक वीज केंद्रांत दैनंदिन 3 लक्ष मेट्रीक टन कोळसाचा तुटवडा

 58 विद्युत केंद्र शेवटच्या घटकेत, तर 70 आपातस्थितीत

महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी वेकोलिकडे तळ ठोकून

चंद्रपूर : देशभरात सर्वत्र मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने विविध कोळसा खाणींमध्ये पाणी साचले आहे. परिणामस्वरूप कोळसा उत्खनन आणि पुरवठयामध्ये कमालीच्या अडचणी येत आहेत. देशात सुमारे 136 विद्युत केंद्रे असून, अगदी ठणठणाट असलेल्या आणि केवळ तीन दिवस कोळश्याचा साठा असणार्‍या सुमारे 58 विद्युत केंद्र शेवटची घटका मोजत आहेत, तर चार ते दहा दिवस कोळसा साठा असणारे सुमारे 70 विद्युत केंद्रे आपातस्थितीत आहेत. देशभरातील औष्णिक वीज केंद्रांकडून होणार्‍या कोळश्याच्या मागणीच्या तुलनेत दररोज सुमारे 3 लक्ष मेट्रीक टन कोळसा अपुरा पडत आहे. अशा बिकट स्थितीत महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी वेकोलिकडे तळ ठोकून आहेत.
महानिर्मितीच्या वीज केंद्रांची मागणी दररोज सुमोर 25 रॅक कोळसा असून, सुमारे 7 ते 8 रॅक कोळसा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी, केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंह यांना तपशिलवार पत्र लिहून महाराष्ट्रातील विजेची सद्यस्थिती आणि कोळशाची मागणी याबाबत माहिती दिली आहे. तसेच आभासी पध्दतीने या दोन्ही मत्र्यांशी तपशिलवार चर्चा करुन, महाराष्ट्राला कोळसा पुरवठा नियमित व्हावा यादृष्टीने पुढाकार घेत आहेत.

सोबतच केंद्रीय सचिव (कोल) आणि सचिव (ऊर्जा) यांच्यासोबत देशभरातील वीज उत्पादन करणार्‍या वीज कंपन्या तसेच कोल इंडिया व त्यांच्या अंतर्गत कार्यरत कोळसा कंपन्या तसेच रेल्वे आदी विभागाचे अधिकारी कोळसा पुरवठा नियमित करण्यासाठी दररोज आभासी बैठका घेऊन ही समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी हेही ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय, कोल इंडिया तसेच अंतर्गत विविध कोळसा कंपन्यांकडे तळ ठोकून आहेत.

महानिर्मितीच्या केंद्राकडे शिल्लक कोळसा साठा

खापरखेडा  0.5 दिवस
पारस        1.25 दिवस
भुसावळ     1.00 दिवस
कोराडी      2.00 दिवस
नाशिक      1.50 दिवस
चंद्रपूर        3.00 दिवस
परळी        1.50 दिवस

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राची स्थिती सुधारतेय

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातही कोळश्याचा तुटवडा असला तरी या केंद्रात कोळश्याच्या ‘व्हॅगन्स’ येणे सुरू असल्याने स्थिती सुधारत आहे. येथे दर दिवशी 22 हजार मेट्रीक टन कोळसा लागतो. सद्यस्थितीत 65 हजार मेट्रीक टन कोळसा असल्याचे आणि तो तिन दिवस पुरू शकत असल्याची माहिती केंद्राच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी तभाला दिली. शिवाय वेकोलिच्या भटाळी, पद्मापूर अशा नजिकच्या कोळसा केंद्रांतून कोळसा येत असल्याने पुढेही कमतरता भासेल, असे वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.