• या रूग्णालयातील उपचारासंदर्भातील अव्यवस्था तातडीने दुर करण्यात याव्या
चंद्रपूर : शासकीय वैदयकीय महाविदयालय व रूग्णालय चंद्रपूर येथील रूग्णांना तातडीने रेमिडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यात यावे तसेच या रूग्णालयातील उपचारासंदर्भातील अव्यवस्था तातडीने दुर करण्यात याव्या अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच वैदयकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांचेकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी वैदयकीय शिक्षण विभागाचे मंत्री व सचिव यांना त्यांनी लेखी पत्रे पाठवत चर्चा देखील केली आहे. शासकीय वैदयकीय महाविदयालय व रूग्णालय चंद्रपूर येथे कोरोना रूग्णांच्या उपचारासंदर्भातील एकुणच स्थीती चिंताजनक व चिंतनीय आहे. कोविड रूग्णांच्या नातेवाईंकाकडुन अनेक तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहे. प्रामुख्याने डॉक्टर्स, नर्सेस रूग्णाच्या जवळ जात नाहीत. दुरूनच रूग्णाला बघतात, रूग्णांना ऑक्सीजन मिळत आहे किंवा नाही याकडे लक्ष दिले जात नाही, रेमिडीसीवीर इंजेक्शन रूग्णाला त्या ठिकाणी दिले जात नाही, बाहेरून इंजेक्शन आणण्याचा सल्ला दिला जातो, रूग्णाची स्थीती कशी आहे याची माहीती नातेवाईकांना दिली जात नाही, इंजेक्शन्स वितरणाची प्रक्रियाच मुळात सदोष आहे ती योग्य होणे गरजेचे आहे. अन्य औषधांबाबत सुध्दा हीच अवस्था आहे, मनुष्यबळाची कमतरता ही प्रमुख समस्या आहे, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांची पदे रिक्त असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे, रेमिडीसीवीर इंजेक्शन बाबत रूग्णांच्या व रूग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी सातत्याने होत आहे. प्रामुख्याने गरीब रूग्णांना बाहेरून इंजेक्शन्स व औषधी बाहेरून आणणे आर्थीक द़ष्टया परवडत नसल्यामुळे त्यांना इंजेक्शन व औषधे आवश्यकतेनुसार उपलब्ध होणे आवश्यक आहे, रूग्ण मरण पावल्यानंतर 8 ते 10 तासाचा कालावधी लोटुन सुध्दा म़ताला बेडवरून उचलत नसल्याने इतर गंभीर रूग्णाला तो बेड उपलब्ध होण्यास फार उशीर होतो. तसेच बेडच्या उपलब्धतेबाबत रूग्णांच्या नातेवाईकांना स्पष्ट शब्दात बेड उपलब्ध नाहीत असे सांगीतल्या जाते त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना बेड शोधण्यासाठी इतरत्र धावाधाव करावी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर रूग्णालयात रूग्णांच्या मदतीच्या द़ष्टीने एक जनसंपर्क अधिकारी नेमण्याची मागणी सुध्दा आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. स्थानिक रूग्णालय प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे रूग्ण दगावत आहेत, असेही आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.