चंद्रपूर : चिमूर येथील हिलींग टच रुग्णालयाला जिल्हा प्रशासनाने डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर म्हणून मान्यता दिली असताना चिमूर येथील पत्रकार विलास मोहिनकर यांनी समाज माध्यमात खोटी माहिती पसरवून हास्पिटलची बदनामी केली, हिलींग टच हॉस्पिटल चे सीओ साईनाथ बुटके यांना रुग्णालयात जाऊन मारहाण केली, या आशयाची तक्रार साईनाथ बुटके यांनी 24 एप्रिल ला चिमूर पोलिसात दिली.
त्याच दिवशी पत्रकार विलास मोहिनकर यांनी हीलिंग टच रुग्णालयाचे संचालक साईनाथ बुटके यांच्या विरोधात मला रुग्णालयात बोलावून मारहाण, अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार चिमूर पोलिसात दाखल केली. दोघांचीही तक्रार अदखलपात्र गुन्हा म्हणून पोलिसांनी दाखल करून घेतली.विलास मोहिनकर यांच्यावर खंडणी मागणे, रुग्णालयाची बदनामी करणे, या गुन्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे चिमूर स्थित हीलिंग टच रुग्णालयाचे सी.ओ. साईनाथ उर्फ अश्वमेघ बुटके, डॉ. अभिषेक निमजे, डॉ. सुधीर बुटके यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेटीवार यांचेकडे केली आहे.
सध्या कोविड – 19 चा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे, शेकडो रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत, राज्य शासन व आरोग्य विभाग प्रयत्न करून कोविडचा सामना करीत आहे. डॉक्टर ,नर्स आदी कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची सेवा करीत आहेत. चिमूर येथील हिलींग टच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला प्रशासनाने डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर म्हणून मान्यता दिली असून कोविड रुग्ण येथे उपचार करीत आहेत. अशा स्थितीत विलास मोहिनकर यांनी दि. 23 एप्रिलला रात्रौ 11.30 वाजताचे दरम्यान दवाखान्यात जाऊन कर्मचाऱ्यांना धमकावून, दवाखान्याची तोडफोड करून नुकसान केली आहे, दवाखान्याबाबत बदनामीकारक वृत्त समाज माध्यमात पसरवून त्रास देणे सुरू केले आहे, असे निवेदनात म्हंटले आहे.
हिलींग टच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बाधितांची चांगल्याप्रकारे व्यवस्था केली जात असताना कर्मचाऱ्यांना विलास मोहिनकर त्रास देत असल्याने विलास मोहिनकर यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी हास्पिटल चे सी.ओ.साईनाथ उर्फ अश्वमेघ बुटके ,डॉ.अभिषेक निमजे, डॉ. सुधीर बुटके यांनी पालकमंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार विजय वड्डेटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली असून जिल्हाधिकारी , जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, एस.डी.ओ. ,एस.डी.पी.ओ. चिमूर, तहसीलदार ,पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिमूर यांना सुद्धा प्रतिनिवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मला वारंवार फोन करून साईनाथ बुटके यांनी रुग्णालयात बोलावले. पैशाचे आमिषसुद्धा दाखवले.मर्दाची औलाद असशील तर हॉस्पिटल मध्ये ये, असे आव्हानसुद्धा दिले. मी हॉस्पिटल मध्ये गेलो.:मला कोविड वार्डाशेजारच्या एका खोलीत डांबून साईनाथ बुटके यांनी माझ्या हॉस्पिटल च्या विरोधात तू का लिहितोस, असे म्हणून मला मारहाण केली. अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मी कसबसा स्वतःचा जीव वाचवला. वैद्यकीय तपासणीत माझ्या अंगावर जखमा असूनही पोलिसांनी साईनाथ बुटके यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही.मी याविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी करीन. :- विलास मोहिनकर (पत्रकार)