• चोवीस लाखांचे प्रसिद्धीचे कंत्राट
• १८ लाखांच्या व्हेटिलेटर रुग्णावाहिकेला पैसे नाही
चंद्रपूर : कोविडमुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी खर्चावर मर्यादा आणल्या. चंद्रपूर मनपा मात्र त्याला अपवाद ठरली. कोरोनाच्या काळात तब्बल चोवीस लाख रुपयांचे प्रसिद्धीचे कंत्राट नागपुरातील एका कंपनीला दिले. दुसरीकडे शहरात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना मनपाकडे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिका घेण्यास पैसे नाही. मनपाच्या या प्रसिद्धीच्या हव्यासावर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक प्रचंड नाराज झाले आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनाने राज्यातील आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे शासनाने खर्चांवर निर्बंध आणले. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थाना यासंदर्भात लेखी सूचनाच दिल्या. मनपा, नगर परिषद यांनी आधी कोविडवर निधी खर्च करावा, असे शासनाने धोरण ठरविले. त्यातच टाळेबंदीमुळे नागरिकांना प्रचंड आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले. याचा परिणाम कर संकलनावर झाला. चंद्रपूर मनपाकडे येत्या दोन तीन महिन्यांनंतर कर्मचा-यांचे वेतन देण्यासाठी पैसे शिल्लक राहणार नाही, असे सांगितले जात आहे. मनपा आर्थिक गाळात रुतून असतानाच मनपातील सत्ताधा-यांना प्रसिद्धीचा मोह झाला. मनपात आधीच कायमस्वरूपी जनसंपर्क अधिकारी आहे. त्यांच्यावर विश्वास न ठेवता मनपाने नागपुरातील एका कंपनीला प्रसिद्धीचे कंत्राट दिले.
या कंपनीने कंत्राटी कर्मचा-याच्या भरोशावर काम सुरू केले आहे. हा कर्मचारी तो समाजमाध्यमांवर मनपाची दररोजची कामे टाकण्याचे काम करतो. त्यासाठी या कंपनीला महिन्याकाठी तब्बल दोन लाख रुपये दिले जाते. मनपानेच दोन कंत्राटी कर्मचारी ठेवले असते, तर हेच काम तीस चाळीस हजार रुपयांत झाले असते. मात्र, नागपुरातील एका भाजप नेत्यांच्या आदेशामुळे मनपाने हे कंत्राट काढले. यामुळे चंद्रपूरकरांच्या खिशातून दोन लाखांची अक्षरक्षः चोरी केली जात आहे. स्थानिक भाजप नेत्यांचाही या कंत्राटाला पाठींबा आहे. त्यामुळे आम्हाला चूप बसावे लागत असल्याची कबुली भाजपच्या एका नगरसेवकाने दिली. दुसरीकडे अठरा लाख रुपयांची व्हेंटिलेटर रुग्णवाहिका घेण्यासाठी मनपाकडे पैसे नाहीत. रुग्णवाहिका चालकांकडून कोरोना रुग्णांची प्रचंड लूट होत आहे. शहरातून शहरातच रुग्ण हलविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी किंमत मोजावी लागते. कोरोनाबाधित आणि त्यांचे आप्त या प्रकारामुळे हतबल झाले आहे. परंतु मनपाला याच्याशी काही देणे घेणे नाही. मृताच्या ढिगा-यावर त्यांचा प्रसिद्धीचा सोस कायम आहे.