राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा भारत बंद ला पाठींबा : डॉ. अशोक जिवतोडे

चंद्रपुर : नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात किसान सभेच्या वतीने पुन्हा एकदा ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली आहे. येत्या सोमवारी (दि.२७) रोजी हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनास राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पाठींबा जाहीर केला आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात भारत बंद ला पाठींबा दिला गेला आहे. सोबतच या काळ्या कृषी कायद्याविरोधात व ओबीसींच्या मागण्यांसाठी शेतकरी व ओबीसी समाजाने केंद्र सरकार विरोधात एक होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रातील सरकारने कृषी कायदे पास करून वर्षभराचा कालावधी उलटला आहे. या तीन कृषीकायद्यांच्या विरोधात तेव्हापासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र या बंदचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गोंगाटाशिवाय शांततेने हा बंद पाळला जाणार आहे.

या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना उत्स्फूर्त सहभाग घेऊ द्यावा, कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कुणालाही सक्ती करू नये, हा बंद सरकार विरोधात असल्याने जनता यात भरडली जायला नको असेही आवाहन यात करण्यात आले आहे. या बंददरम्यान रुग्णालये, मेडिकल सुविधा, रुग्णवाहीका, अग्निशमन सेवा यांसारख्या तातडीच्या सेवा सुरू राहतील. याशिवाय इतर सर्व व्यवहार या दिवशी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये शेतकऱ्यांसमवेत शासकीय व निमशासकीय कर्मचारी, शाळा-महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आदी आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत.