लॉकडाऊन शिथील होणार ? मुख्यमंत्री आज साधणार जनतेशी संवाद

मुंबई : देशभरात थैमान घालणारी करोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात असलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत असून रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता लॉकडाऊन उठणार का ? याकडे लागल्या आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील करोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. आज रविवारी (30 मे 2020) रात्री 8.30 वाजता उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधतील. यावेळी ते करोना रुग्णसंख्या, लॉकडाऊन, करोना लसीकरणासह विविध विषयांवर चर्चा करणार आहे.

करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सरकार राज्यातील लॉकडाऊन उठवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच करोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. तर तिसऱ्या लाटेत बालके संसर्गग्रस्त होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर उद्धव ठाकरे आज संवाद साधण्याची शक्यता आहे.

दरम्यान ठाकरे सरकार 1 जूनपासून लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल, अशा व्यक्त करण्यात येते.