२ लाख ४२ हजार रुपये होणार सरपंच, ग्रामसेवकाडून वसूल
मुख्य कार्यकारी अधिका-यांचे आदेश
गड़चांंदुर (चंद्रपूर) : गतवर्षी ग्रामपंचायत बिबी अनेक घोळांमुळे चर्चेत राहिली होती. ग्रामपंचायत बिबी येथील सरपंच मंगलदास गेडाम यांनी लोकवर्गणीतून बिबी ते पाटोदा, शनिशिंगणापूर, शिर्डी, हिवरेबाजार येथे आदर्श गाव अभ्यास दौरा केला. या अभ्यास दौरा करिता लोकवर्गणी काढली असताना देखील खोटे व बनावटी गाडी क्रमांकाचे बिले जोडून ग्रामपंचायतीच्या स्मार्ट ग्राम निधीतून २ लाख ४२ हजार रुपयांची उचल करण्यात आली. यासंदर्भात नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले यांचेकडे तक्रार केली असता चौकशीतून ‘आदर्श’ घोटाळा उघड झाला आहे. तसे सिईओंनी रक्कम वसूलीचे आदेश सरपंच व ग्रामसेवक यांना दिले असून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
स्मार्ट ग्राम निधीतून महिला सक्षमीकरण या निकषांवर बिबी ग्रामपंचायतीने १२१ महिलांचा आदर्श गाव अभ्यास दौरा राळेगणसिद्धी, पाटोदा, हिवरेबाजार येथे करण्यात आला. जिल्ह्याबाहेर शासकीय दौरा करताना सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र ग्रामपंचायतीने अशी कुठलीही परवानगी घेतलेली नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले. गावातील नागरिकांना अभ्यास दौरा लोकसहभागातून होत असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी प्रत्येकी नागरिकांकडून एक हजार रुपये लोकवर्गणी काढण्यात आली. मात्र सदर दौऱ्याचे बिल स्मार्ट ग्राम निधीतून काढून ग्रामपंचायतीने लाखों रुपयांचा आदर्श घोटाळा केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. याबाबत सरपंचाची संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली व बोलण्यास नकार दिला.
छत्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून याबाबची बोगस बिले घेतली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिबी येथील सजग नागरिक संतोष पावडे, चंदू चटप, संतोष उपरे, भारत आत्राम, स्वप्नील झुरमुरे, विजय हंसकर, राजेश खनके, सचिन सिडाम, हबीब शेख, सुनिल भोयर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत पंचायत स्तरावर गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीअंती खोटे बिले व बनावटी गाडी क्रमांक टाकून २ लाख ४२ हजार रुपयांचा जो निधी उचलला त्याची वसुली सरपंच व ग्रामसेवक यांचे मार्फत समप्रमाणात करण्यात यावी तसेच सरपंच मंगलदास गेडाम यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ (१) अन्वये अपात्रतेची कारवाई का करण्यात येवू नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या आदर्श घोटाळ्यामुळे सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर मोठी नामुष्की आली आहे. सरपंच मंगलदास गेडाम : 9921211584