• बैलबंडी व दुचाकी रॅली या आंदोलनाचं आकर्षण
चंद्रपूर : कोरोनाकाळातील लॉकडाऊननंतर जवळजवळ 20 वेळा झालेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीला विरोध करत आज शुक्रवारी ५ फेब्रुवारी २०२१ ला शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार च्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. बैलबंडी व दुचाकी रॅली या आंदोलनाचं आकर्षण होतं, इंधन दरवाढ, घरगुती गॅस सिलेंडर यासह अनेक गोष्टींचा विरोध करत हे आंदोलन करण्यात आले.
जटपुरा गेट वरून आंदोलनाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन करून समारोप करण्यात आला. पेट्रोल आणि डिझेल महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ होत असल्यामुळे महागाईचा भडका सहन करावा लागतो. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली.
जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी यावेळी केंद्र सरकारने देशवासीयांची फसवणूक केली, मोदी सरकार सत्तेत आल्यावर पेट्रोल, डीझल व गॅस सिलेंडरचे भाव कमी करू असे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन पूर्णतः खोटे निघाले असा आरोप त्यांनी यावेळी केला. सदर आंदोलनात शिवसेना, युवासेना व महिला सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.