“डेरा आंदोलन” मृतक कोविड योद्ध्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर श्रद्धांजली

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मागील १ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील कोविड योध्या कंत्राटी कामगारांना थकीत पगाराचा प्रश्न भेडसावत आहे. जुलै २०२० पूर्वीसुद्धा सफाई कामगार, कक्ष सेवक,सुरक्षारक्षक, ऑपरेटर अशा विविध पदावर काम करणार्‍या ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांना ६ महिन्याचे पगार देण्यात आले नव्हते. या दरम्यान एप्रिल २०२० मध्ये प्रदीप खडसे व ऑगस्ट २०२० मध्ये संगीता पाटील या कामगाराचे कामावर असताना मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन निधन झाले. या दोन्ही कामगारांचा थकीत पगाराच्या मानसिक तणावाने मृत्यू झाला असा जनविकास कामगार संघाचा आरोप आहे.

दिवंगत प्रदीप खडसे यांच्या जागेवर त्यांची पत्नी वर्षा खडसे यांना रोजगार देण्यात आला होता. वर्षा खडसे यांचे सुद्धा नुकतेच २८ मे २०२१ रोजी निधन झाल्यामुळे खडसे दाम्पत्याचे प्रणल व मोनिका या दोन्ही मुलाच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले. सात महिन्याच्या थकीत पगारासाठी जवळपास चार महिन्यापासून कामगाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू आहे. अकरा महिन्यापासून कामगारांचा पगार नसल्यामुळे उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. औषधालाही पैसे नाही अशी कामगारांच्या कुटुंबाची अवस्था झालेली आहे. उपचारासाठी पैसे नसल्यामुळे कामगारांच्या कुटुंबातील सदस्य असलेले शंकर शेट्टी, किशोर वैद्य, यादव शेंडे व रमेश कामडी यांचे मागील ४ महिन्यात निधन झाले असा सुद्धा जनविकास कामगार संघाचा आरोप आहे.

दिनांक १ जून २०२१ रोजी दुपारी एक वाजता च्या दरम्यान डेरा आंदोलनातील कामगारांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कामगार तसेच कामगारांच्या कुटुंबातील मृत व्यक्तींचे फलक लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्यावरून कामगार व पोलिसांमध्ये संघर्ष झाला.मात्र अखेर पोलिसांना नमते घ्यावे लागले.यानंतर जिल्हाधिकाऱी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकावर पुष्पहार व फुले अर्पण करून मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व २ मिनिटे मौन पाडण्यात आले. कामगार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे थकीत पगार किंवा उपचार अभावी झालेले मृत्यू हे वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री अमित देशमुख, सचिव सौरभ विजय, संचालक तात्याराव लहाने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी केलेले खून आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी
जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिली. श्रद्धांजली कार्यक्रमाला जन विकास सेनेचे पदाधिकारी राहुल दडमल, गीतेश शेंडे, आकाश लोडे, अक्षय येरगुडे, इमदाद शेख व मनिषाताई बोबडे जन विकास कामगार संघाचे पदाधिकारी कांचन चिंचेकर, सतीश येसांबरे,अमोल घोडमारे, शेवंता भालेराव, ज्योती कांबळे, नीलिमा वनकर, निशा साव, विद्या चिंवडे, निशा हनुमंते, भाग्यश्री मुधोळकर, प्रमोद मांगरूडकर, रवी काळे, प्रविण अत्तेरकर,कविता सागोरे, सपना दुर्गे, सीमा वासमवार उपस्थित होते.