• महिला कामगारांच्या आक्रोशाची मंत्री अमित देशमुख यांच्याकडून दखल
चंद्रपूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे मंत्री अमित देशमुख यांच्या नुकत्याच झालेल्या चंद्रपूर दौऱ्यामध्ये डेरा आंदोलनातील महिला कामगारांनी आपली व्यथा मांडण्यासाठी आक्रोश केला. अमित देशमुख यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दोन महिला कामगार उद्विग्न होऊन व्यथा मांडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओवर सोशल मीडियातून संतप्त भावना व्यक्त झाल्या. यानंतर मंत्री अमित देशमुख यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. आज कामगार दिनी दिनांक १ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अमित देशमुख यांचे विशेष कार्यकारी अधिकारी गुंजकर यांचा जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या मोबाईलवर कॉल आला.
डेरा आंदोलनातील कामगारांच्या समस्यांवर तोडगा काढण्याबाबत पप्पू देशमुख यांचे सोबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संचालक यांना तातडीने या प्रश्नावर समाधान काढण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सुद्धा पप्पू देशमुख यांना दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांच्या निर्देशानुसार त्यांचे विशेष कार्यकारी अधिकाऱी गुंजकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यथा मांडणाऱ्या महिला कामगारांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. शेवंता भालेराव या महिला कामगारांशी त्यांनी मोबाईलवर सविस्तर चर्चा करून लवकरच थकीत पगार देण्याचे आश्वासन मंत्री अमित देशमुख यांच्यातर्फे दिले. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री स्वतः जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना फोन करून डेरा आंदोलनातील कामगारांच्या सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करतील अशी सुद्धा माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे अमित देशमुख यांच्या दौऱ्याच्या वेळी झालेल्या घटनेने डेरा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालय स्तरावर हालचालींना वेग आल्याची माहिती मिळालेली आहे. दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्यांकडून पप्पू देशमुख यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता.
कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या कार्यालयातून मिळालेल्या आश्वासनाचा शासनाला विसर पडू नये अशी अपेक्षा यानिमित्ताने जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी व्यक्त केली.