चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना योध्यांना मागील 10 महिन्यापासून वेतन न मिळाल्याने त्यांनी मागील 3 महिन्यापासून डेरा आंदोलन सुरू केले आहे.
आज- उद्या पगार होणार या आशेवर कंत्राटी कामगारांना 10 महिने शासनाने वेतनापासून वंचित ठेवले. असे असताना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करीत कंत्राटी कामगार वेतनाविना कोरोना रुग्णांची सेवा करीत आहे. चंद्रपूर शासकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगार विद्युत विभागातील सुदेश टेंभरे यांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. मेडिकल कॉलेज येथे उपचार घेत असलेल्या सुदेश टेंभरे यांना योग्य उपचार मिळाला नाही असा आरोप टेंभरे कुटुंबीयांनी केला आहे.
ज्यावेळी त्यांची तब्येत खालावली नेमकं त्याचवेळी डॉक्टरांना याबाबत सांगितले मात्र त्यांनी कोणताही उपचार केला नाही त्यामुळेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असा आरोप मृतकांच्या मुलीने केला आहे.
यंग चांदा ब्रिगडचे कुलमेथे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पोहचत टेंभरे कुटुंबियांचे सांत्वन करीत मृतकांच्या मुलीला कंत्राटी नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी यावेळी केली.
उपस्थित कंत्राटी कामगारांनी सांगितले की मागील 10 महिन्यापासून टेंभरे यांना वेतन मिळाले नव्हते त्यामुळे ते मानसिक तणावात होते, प्रशासनातील अधिकारी निव्वळ कंत्राटी कामगारांच्या पगाराचे पैसे खात आहे, आम्हाला सुद्धा कुटुंब आहे, अजून किती समस्यांना आम्ही सामोरे जाणार? 10 महिन्याचे वेतन टेंभरे कुटुंबियांना देऊन त्यांच्या मुलीला कंत्राटी नोकरीत घ्यायला हवे.