१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी शहरात दोन केंद्र
चंद्रपूर : १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी शहरात दोन केंद्र सुरु करण्यात आले आहेत. केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक लसिकरण केंद्रावर वेगवेगळया रंगाचे टोकन वितरित करण्याचे प्रस्तावित आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेकरीता पिवळया रंगाचे टोकन, सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेकरीता हिरव्या रंगाचे टोकन, दुपारी १ ते ३ या वेळेकरीता नारंगी रंगाचे टोकन तसेच दुपारी ३ ते ५ या वेळेकरीता पांढऱ्या रंगाचे टोकन देण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांकरीता पंजाबी सेवा समिती, तुकूम तसेच रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, रामनगर या २ केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केद्रांत लाभार्थ्यांना मिळालेल्या तारखेनुसार तसेच स्लॉटनुसार कोव्हीन ऍप किंवा आरोग्य सेतू ऍपमधील नोंदी प्रमाणे लसिकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
१८ वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा मागील महिन्यात केंद्र सरकारने केली. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत रविवार, दिनांक २ मेपासून पंजाबी सेवा समिती, तुकूम तसेच रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, रामनगर या दोन केंद्रावर १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे. उर्वरीत लसिकरण केंद्रांवर ४५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ६० टक्के लाभार्थ्याना स्लॉटप्रमाणे तसेच ४० टक्के लाभार्थ्यांना टोकन पध्दतीने प्रथम आलेल्यांना प्रथम या प्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्रावर विनाकारण गर्दी न करता लसीकरण करणाऱ्या चमूला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.