जिल्‍हयातील उदयोगांनी CSR निधीतुन उदयोग परिसरात उत्‍तम आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध कराव्‍या – आ. सुधीर मुनगंटीवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
उदयोगांच्‍या प्रतिनिधींशी संवाद साधत कोविडच्‍या लढाईत योगदान देण्‍याचे आवाहन
जिवती येथील ग्रामीण रूग्‍णालयाला रूग्‍णवाहीका उपलब्‍ध करून देण्‍याचे माणिकगड सिमेंट कंपनीचे आश्‍वासन

चंद्रपूर : जिल्‍हयातील उदयोगांचे जिल्‍हयाच्‍या औदयोगिक विकासात मोलाचे योगदान आहे. उदयोगांना त्‍यांच्‍या सामाजिक दायित्‍व निधीतुन समाजाप्रती आपले कर्तव्‍य निभावण्‍याची संधी आहे. सि.एस.आर. संर्भातील मार्गदर्शक तत्‍वांमध्‍ये बदल करण्‍यात आला असुन आता कोणताही उदयोग 100 टक्‍के सि.एस.आर. निधी कोविड संदर्भातील उपाययोजनांसाठी खर्च करू शकतो. कोविडच्‍या प्रादुर्भावासंदर्भात चंद्रपूर जिल्‍हा राज्‍यातील सातव्‍या क्रमांकाचा संवेदनशिल जिल्‍हा ठरला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍यांचे स्‍वतःचे हॉस्‍पीटल्‍स आहे त्‍या उदयोगांनी सि.एस.आर. निधीच्‍या माध्‍यमातुन बेडस्, ऑक्‍सीजन बेडस्, ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर आदी उत्‍तम आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करून कोविडच्‍या लढाईसाठी सज्‍ज व्‍हावे व आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक ४ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हयातील उदयोगांच्‍या प्रमुखांशी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला व त्‍यांच्‍याद्वारे करण्‍यात आलेल्‍या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांबाबत चर्चा केली. या बैठकीला भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माणिकगड सिमेंट, अल्‍ट्राटेक, गोपानी आर्यन, धारिवाल, लॉयड मेटल्‍स्, दालमिया सिमेंट, अंबुजा सिमेंट आदी उदयोगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत उदयोग प्रतिनिधींशी संवाद साधताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, उदयोगांनी त्‍यांच्‍या परिसरातील शासकीय रूग्‍णालयांना रूग्‍णवाहीका उपलब्‍ध कराव्‍या, कमी वेळात रूग्‍णवाहीका उपलब्‍ध करून देणे शक्‍य नसल्‍यास भाडयाची वाहने उपलब्‍ध करून दयावी, उदयोगातील कामगारांना, त्‍यांच्‍या कुटुंबियांना लसीकरणाचा लाभ मिळवून देण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा, जनजाग़तीच्‍या दृष्‍टीने उदयोगांनी फलक लावावे, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर मशिन उपलब्‍ध कराव्‍या अशा सुचना आ. मुनगंटीवार यांनी केल्‍या. उदयोगांलगतचा परिसर हा ग्रामीण भाग असल्‍यामुळे व ग्रामीण भागात घरे छोटी असल्‍यामुळे विलगीकरणाची व्‍यवस्‍था योग्‍य पध्‍दतीने होत नसल्‍यामुळे रूग्‍ण संख्‍या वाढत आहे. यादृष्‍टीने उदयोगांनी त्‍यांच्‍या हॉस्‍पीटलमध्‍ये कोविड केअर सेंटर तयार केल्‍यास हा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या द़ष्‍टीने योग्‍य उपाययोजना ठरेल असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. कामगार, कर्मचारी व परिसरातील नागरिकांच्‍या सोयीच्‍या दृष्‍टीने कॉलसेंटर उपलब्‍ध करण्‍याच्‍या सुचना सुध्‍दा त्‍यांनी दिल्‍या.

सध्‍या रूग्‍णांना रेमिडीसीवीर या इंजेक्‍शनची मोठया प्रमाणावर आवश्‍यकता आहे. उदयोगांनी हे इं‍जेक्‍शन्‍स खरेदी करून परिसरातील रूग्‍णालयांना उपलब्‍ध करावे असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. उदयोगांनी प्रारंभीक उपचारासाठी औषध गोळयांची किट तयार करून ती कामगारांमध्‍ये वितरीत करावी, कामगार, कर्मचारी यांच्‍यासह परिसरातील नागरिकांना मास्‍कचे वितरण करावे, स्‍थानिक महिला बचतगटांकडुन मास्‍क तयार करून घेतल्‍यास त्‍यांनाही उत्‍पन्‍नाचा स्‍त्रोत उपलब्‍ध होईल अशी सुचना देखील त्‍यांनी केली. यावेळी विविध उदयोगांच्‍या प्रति‍निधींनी त्‍यांनी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या द़ष्‍टीने केलेल्‍या उपाययोजनांची माहिती आ. मुनगंटीवार यांना दिली. आ. मुनगंटीवार यांनी केलेल्‍या सुचनांच्‍या अनुषंगाने निश्चितपणे आवश्‍यक उपाययोजना व कार्यवाही करण्‍यात येईल असे उदयोगाच्‍या प्रतिनिधींनी आश्‍वत केले. गडचांदुर व घुग्‍घुस या परिसरात संबंधित उदयोगांनी आर.टी.पी.सी.आर. चाचणी केंद्र करावे व प्रत्‍येक उदयोगाने दोन रूग्‍णवाहीका उपलब्‍ध कराव्‍या याबाबत आ. मुनगंटीवार यांनी उदयोग प्रतिनिधींना सुचना दिल्‍या. जिवती येथील ग्रामीण रूग्‍णालयाला त्‍वरीत रूग्‍णवाहीका उपलब्‍ध करून देण्‍यात येईल असे माणिकगड सिमेंट कंपनीचे श्री. काबरा यांनी सांगीतले.