चंद्रपूर : राजुरा शहराजवळ असलेल्या रेल्वे पुलालगतच्या शेतात काम करीत असलेल्या भाग्यश्री धनराज वाढई या (वय 30) महिलेवर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. आज (दि. 5) दुपारी तीन वाजता ही दुर्घटना घडली.
राजुरा शहरातील अंबादास नगर येथील धनराज वाढई हे पत्नी भाग्यश्री सोबत रेल्वे पुलाजवळ एका शेतात काम करीत होते. त्याचवेळी दोन वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला.
यावेळी आश्रय घेण्यासाठी भाग्यश्री वाढई ही शेतातील झोपडीकडे जात असतानाच तिच्या अंगावर वीज पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. मृतक महिलेचे मागे पती आणि दोन लहान मुले आहेत. तिच्या मृत्यूमुळे कुटूंबावर शोककळा पसरली आहे.