• मोहफुल वेचायला गेले होते जंगलात
• आठवडाभरात तिसरी घटना, चौघांचा बळी
चंद्रपूर : कुटूंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत पवनपार बिट-2 मधील कक्ष क्रमांक 1413 मध्ये वनविभागाच्या अखत्यारीत जंगलात मोहफुल वेचायला गेलेल्या काका पुतण्यावर एकाचवेळी वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी (6 एप्रिल 21) ला सकाळी सिंदेवाही तालुक्यातील पवनपार ते खैरी लगतच्या जंगलात सकाळी सातच्या सुमारास घडली. काका कमलाकर उंदिरवाडे (वय ६५) व पुतण्या दुर्वास उंदिरवाडे (वय ४८) असे मृतांची नावे आहेत. आठवडाभरातील ही तिसरी घटना असून आज मंगळवारी एकाच घटनेत दोघांचा बळी गेला आहे.
चंद्रपूर जिल्हयातील बहुतांश भाग हा जंगलव्याप्त आहे. शिवाय ताडोबा अभयारण्य लागून आहे. जंगल परिसर गावातील नागरिक दरवर्षी मोहफुल वेचून आपल्या त्या मिळकतीतून आपल्या कुटूंबाच्या गरजा पूर्ण करतात. आज मंगळवारी कुटूंबाच्या गरजा पूर्ण करण्याच्या उदेश्याने सिंदेवाही तालुक्यातील पवनपार येथील गावालगतच्या जंगलात काका कमलाकर उंदिरवाडे आणि पुतण्या दुर्वास उंदिरवाडे हे मोहफुल वेचायला गेले होते. सदर घटना पनपार ते खैरी मार्गावरील जंगलपरिसरात आणि गावापासून जवळच घडल्याने मोहफुल वेचायला गेलेल्या अन्य नागरिकांना लक्षात आली. त्यांनी घटनेची माहिती गावात देताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी काका आणि पुतण्याचा मृतदेह आढळून आला. सदर माहिती वनविभाग आणि पोलिसांनी देण्यात आली. लगेच दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाची मौक्काचौकशी करून पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन सिंदेवाही येथे ग्रामीण रूग्णालयात श्वविच्दछेदनासाठी पाठविले. या घटनेने पवनपार आणि सिंदेवाही तालुक्यात जंगलव्यापत गावांमध्ये प्रचंड दहशत निर्माण् झाली आहे.
मृतक काका कमलाकर उंदिरवाडे यांच्या कुटूंबात पत्नी, 1 मुलगा 2 मुली तर दुर्वास उंदिरवाडे यांच्या कुटूंबात पत्नी 1 मुलगा व 1 मुलगी असा परिवार आहे. वनविभागाने दोन्ही कुटूंबियांना तातडीने प्रत्येकी 25 हजार रूपये मदत केली आहे. उंदिरवाडे कुटूंबातील काका आणि पुतण्या हे कर्ते होते. वाघाच्या हल्यात त्यांचा मृत्यू झाल्यामुळे कुंटूंबच कर्त्यांपासून पोरके झाले आहे.
आठवडा भरात मुल तालुक्यातील आगडी येथील एक महिला तर सिंदेवाही तालुक्यातील शिरकाडा येथील एक इसम आणि आज मंगळवारी पवनपार येथील काका आणि पुतण्या यांचा एकाचवेळच्या घटनेत दोघांचा बळी गेला. आठवडाभरात तब्ब्ल चार बळी वाघाच्या हल्यात झाले आहेत. या घटनेमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असून ताबडतोब वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करावा आणि मृतांच्या कुटूंबियांना भरघोष मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.