• ४५ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी वेळेचा ऑनलाईन ‘स्लाॅट’ देऊन लसीकरण कार्यक्रम राबविण्याची मागणी
चंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून नगरसेवक पप्पू देशमुख वडगाव प्रभागातील गजानन महाराज मंदिर व शकुंतला लाॅन या लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सहकार्य करीत आहेत. आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर दररोज लसिकरण कार्यक्रमाबाबत माहिती टाकून नागरिकांना लसीकरणा बाबत माहिती पुरविण्याचा उपक्रम देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेला आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांना भर उन्हात पाच-सहा तास ताटकळत बसावे लागते.नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे तसेच लसीकरण केंद्रावरील गर्दीमुळे कोरोना संक्रमणाचा धोका सुद्धा वाढत आहे. या समस्येवर तातडीने मार्ग काढण्यासाठी १८ ते ४४ वर्ष वयोगटा प्रमाणे ४५ ते ६० वर्ष वयोगटाच्या नागरिकांसाठी दिवस व वेळेचा स्लाॅट त्यांच्या मोबाईलवर पाठवून 100% ऑनलाइन पद्धतीने लसीकरण कार्यक्रम राबविण्यात यावा अशी मागणी जनविकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देशमुख व त्यांना लेखी पत्र देऊन देशमुख यांनी ही मागणी केली.
सध्या या गटातील नागरिकांसाठी ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मोबाईलवर वेळेचा स्लाॅट व ऑफलाईन टोकन देण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम व गैरसमज निर्माण होत आहेत.लसीचा अनियमित व अपुरा पुरवठा व त्यामुळे ढासळलेले नियोजन हा सुध्दा लसीकरण कार्यक्रमातील गंभीर प्रश्न आहे. भल्या पहाटे पासून नागरिक लसीकरण केंद्रावर टोकण घेण्यासाठी रांगेत उभे राहतात. चार- पाच तासानंतर प्रत्यक्ष टोकन देणे सुरू होते. ज्येष्ठ नागरिक,अपंग व्यक्ती व सर्वसामान्य नागरिकांना यामुळे भर उन्हात ताटकळत बसावे लागते. नागरिकांची गर्दी सुध्दा कोरोना संक्रमणासाठी धोकादायक होत आहे.अनेक लोकांना चार-पाच तास उभे राहिल्यानंतर सुध्दा लस मिळत नाही व त्यांना परत जावे लागते.यामुळे आरोग्य कर्मचारी नागरिकांच्या रोषाला बळी पडत आहेत.
त्यामुळे ऑनलाइन-ऑफलाइन अशा संमिश्र पद्धतीने लसीकरण कार्यक्रम राबविणे बंद करण्यात यावे, व ४५ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांप्रमाणे ‘वेळ व दिवसाचा स्लाॅट’ मोबाईलवर पाठवून सरसकट १०० टक्के ऑनलाइन पद्धतीने लसीकरण कार्यक्रम राबविण्यात यावा अशी मागणी नगरसेवक देशमुख यांनी केलेली आहे.