चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाला नष्ट करण्यासाठी महिलांचे “मातामाय” ला साकडे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• ग्रामीण भागातील महिला ” मातामाय” ला पाणी नेऊन करतायेत पूजा अर्चा

चंद्रपूर : देशभरात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर नंतर दुसरी लाट आली आणि विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. शहरी असो की ग्रामीण भाग गावागावात रुग्णांचे प्रमाण वाढले. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने सुचवलेले निकष नियमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरी कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होण्याएऐवजी वाढत आहे. आरोग्य विभागाचे डॉक्टर अधिकारी-कर्मचारी देवदूत होऊन या आजारातून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, मात्र रुग्णांच्या वाढत्या प्रमाणामुळे बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार यामुळे सामान्यजण पुरता बेजार झाला आहे.

रुग्णांचा मृत्यू रोखण्यासाठी आणि नागरिकांना बाधित होण्यापासून वाचवण्यासाठी आरोग्य विभाग गावातील यंत्रातील कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मात्र मृत्यू आणि बाधितांची वाढणारी संख्या यामुळे भीतीमय वातावरणात नागरिक जीवन जगत आहेत.

डॉक्टर जिवाची पर्वा न करता आपले प्रयत्न करीत असतानाच आता ग्रामीण भागात कोरोनाला नष्ट करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी “मातामाय” ला साकडे घातले आहे. दररोज सकाळी दूपारी किंवा सायंकाळी पाणी नेऊन मातामायची पूजाअर्चा करीत आहेत. कोरोनाला नष्ट आणि कोरोनाचे संकट लवकर दूर कर अशी विनवणी करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

कोरपना तालुक्यातील बिबी गावातील महिला दररोज गावात असलेल्या “मातामाय” ला ( मातामाय देवीचा रुप आहे) सकाळी आणि सायंकाळी डोक्यावर हंडा घेऊन पाणी घेऊन जातात. पाण्याने मातेची आंघोळ करतात. त्यानंतर पूजाअर्चा करुन गावात शिरकाव झालेल्या कोरोनाला नष्ट करण्यासाठी आवाहन करतात. आणि हे नित्यनियमाने सुरू आहे. हे चित्र एकट्या बाबी गावातील नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर विदर्भातील विविध जिल्हयात दिसून येत आहे. ही पूजाअर्चा श्रद्धेचा भाग असला तरी यावरून कोरोनाविषाणुची भीषणता लक्षात येते.

प्रत्येक महिला कोरोना नियमांचे पालन करून मातामायला पाणी चढवतात आणि मोठ्या श्रद्धेने पूजाअर्चा करून कोरोनाची दुसरी लाट निघून जाण्याकरीता आवाहन करीत आहेत. एकीकडे डाॅक्टरांचे रूग्णांना जीवदान देण्याचे प्रयत्न तर दुसरीकडे महिलांची संघटन शक्ती धार्मिक आवाहन करून कोरोनाला थोपविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र विदर्भात जिल्ह्यात दिसून येत आहे.
ग्रामीण भागात होणार्‍या वैवाहिक कार्यक्रम मातामायला पाणी नेऊन तिथे पूजा-अर्चा केल्याशिवाय पार पडत नाही. अन्य कोणतेही गावातील सामुदायिक धार्मिक कार्यक्रम असो माता मायचे पूजा केल्या पार पडत नाही. ही परंपरा वर्षानूवर्षापासून ग्रामीण भागात चालत आलेली आहे. याच परंपरेचा आधार आता कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी महिलासंटन शक्तीने घेतला आहे.
कोणतेही संकट असो त्यावर मात करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असले तरी त्याला धार्मिकतेची सांगड असतेच. कोणतेही औषध उपचार नसताना देशभरात कोरोना संकटाचा सामना प्रत्येक नागरिक करत आहे आणि त्यावर मात देखील करीत आहेत.कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे तर उपलब्ध असलेल्या औषधोपचाराने रुग्ण बरे देखील होत आहे.

कोरोना विषाणूचा संसर्गामुळे राज्यात दुस-यांदा कडक लाॅकडाऊ लावण्यात आले आहे. शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प पडले आहे. पहिल्या लाटेत शहरी भागात विषाणूचा जास्त संसर्ग होता मात्र दुसर्‍या लाटेत शहरांसोबतच ग्रमीण भागात शिरकाव झाला. आरोग्य विभाग उपलब्ध असलेले औषौधोपचार करून रुग्ण कोरोनावर मात करीत आहेत. मात्र मृत्यू आणि बाधित रुग्णांचा संख्या ही सामन्यांना भयभीत करणारी आहे. डाॅक्टर देवदूत बनून रुग्णांना या संसर्गातून बाहेर काढत आहेत. तरीही बेडची कमतरता, आॅक्सीजनचा तुटवडा, रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार यामुळे ग्रामीण भागातील नागरिक प्रचंड दहशतीत जीवन जगत आहेत.

भीतीमुळे खचून जात मानसिक संतुलन ढासळत चालला आहे.त्यामुळे कोरोनाची भीतीमय परिस्थिती गावातून हद्दपार करण्यासाठी महिलाशक्तीचे मातामायेला घालण्यात येणारे साकडे गावातील परिस्थिती नियंत्रणासोबतच कोरोना योद्धांना बळ देणारे ठरो, एवढेच या माध्यमातून सांगायचे आहे.