आजपासून विदर्भ साहित्य संघाची व्याख्यानमाला

चंद्रपूर : विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखा चंद्रपूर तर्फे आजपासून तीन दिवसीय आभासी व्याख्यानमाला ‘स्मरण शब्दयात्रींचे’ आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११, १२ व १३ जून रोजी साने गुरुजी, पु.ल.देशपांडे, प्र.के.अत्रे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त सायंकाळी ७ ते ८ या वेळात ‘विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखा चंद्रपूर’ या अधिकृत फेसबुक पेजवर आभासी व्याख्यानमाला पार पडणार आहे.

आज ११ जूनला साने गुरुजी स्मृतीदिनानिमित्त साहित्याचे अभ्यासक डॉ.परमानंद बावनकुळे यांचे मानवतावादी साने गुरुजी या विषयावर व्याख्यान संपन्न होईल. उद्या १२ जूनला आठवणीतील पु.ल. या विषयावर दुसरे पुष्प प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.शरदचंद्र सालफळे गुंफतील.

१३ जूनला प्र.के.अत्रेंची विविध क्षेत्रातील नाममुद्रा या विषयावर कवी व नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी यांचे व्याख्यान होईल. विदर्भ साहित्य संघाच्या आॅनलाईन व्याख्यानमालेत सहभागी होण्याचे आवाहन साहित्य उपक्रम समीतीचे प्रमुख गोपाल शिरपूरकर, सचिव इरफान शेख, शाखा समन्वयक डॉ.श्याम मोहरकर यांनी केले आहे.