माजी आमदार सुदर्शन निमकर; रानभाजी महोत्सवात महिलांना केले प्रोत्साहित
राजुरा : जागतिक आदिवासी दिनाप्रीत्यर्थ (दि.09) सोमवरला महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या निर्देशानुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने नवीन प्रशासकीय भवन तहसील कार्यालय राजुरा येथे आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सवाला माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी भेट देऊन विविध महिला बचत गट व शेतकऱ्यांनी लावलेल्या स्टॉल वरील रानभाज्यांचे अवलोकन करून भाज्यांची खरेदी केली व बचत गटांच्या महिला व शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रोत्साहित केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी व्ही. के. मकपल्ले, चुनाळा ग्रा. पं. चे सरपंच बाळू वडस्कर, कृषी पर्यवेक्षक विजय भुते, कृषी सहाय्यक पी. जे. खिल्लारे, राहुल वाघमारे इत्यादी उपस्थित होते. हा रानभाजी महोत्सव 9 आगस्ट ते 15 आगस्ट पर्यंत चालणार असून जनतेनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.
यावेळी सुदर्शन निमकर यांनी महिलांना प्रोत्साहित करताना संगितले की, रानभाज्या ह्या विशेषतः ग्रामीण, जंगली भागात आढळून येत असून नैसर्गिक विना रासायनिक खत व केमिकल विरहित फवारणीने उगवलेल्या असतात, मोठ्या प्रमाणात विविध जीवनसत्वयुक्त, आरोग्यासाठी पोषक असून याचा मानवी आरोग्याला फायदा होतो, रानभाज्या ह्या मानवी दीर्घआयुष्य वाढविण्याचे काम करीत असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना हंगामी रोजगार उपलब्ध होईल.
याचबरोबर कृषी विभागाने रानभाज्या विक्रीकरिता बचत गट व शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.
कोव्हिड-१९ सारख्या महामारीच्या काळात दररोजच्या आहारात अधिकाधिक नागरिकांचा कल रानभाज्या, औषधी वनस्पती, त्यापासून तयार केलेला काळा, अधिकाधिक प्रमाणात जीवनसत्व असलेल्या जंगली रानभाज्या, फळ यांचा समावेश करून आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होते. अश्या वेळेस रानभाज्या किती महत्वपुर्ण आहे हे नागरिकांना माहित झाल्याने रानभाज्यांना विशेष महत्व प्राप्त झाले असून कृषी विभागाने पुढाकार घेत ग्रामीण भागात यासंबंधी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.