चंद्रपूर मनपा क्षेत्रात 19 हजार 566 रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात

• रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटली

चंद्रपूर : शहरात मे महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, आतापर्यंत 19 हजार 566 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मागील 24 तासात ३०० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. १३ मेपर्यंत एकूण एक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 हजार 158 इतकी होती.

महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या प्रयत्नानंतर शहरातील गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या घटत आहे. शिवाय व्यापक उपाययोजनांमुळे शहरातील एकूण एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्यादेखील कमी होत आहे.

महानगरपालिका हद्दीत मागील आठवड्यात ८० टक्के रुग्ण गृहविलीगीकरणात होते. अनेकांच्या घरी रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. झोपडपट्टी परिसरात बिकट स्थिती आहे. अशावेळी कोव्हीड संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या ४० टक्क्यावर आणण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या.

शहरात ५ मे रोजी गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या 2416 इतकी होती. १३ मे रोजी ती 1746 पर्यंत कमी झाली आहे. या सोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्याही घटली आहे.

राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका अंमलबजावणी करीत आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची अँटीजन चाचणी, विनामास्क फिरणाऱ्यावर दंड, निर्बंधानंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्यावर कारवाई, व्यापक लसीकरण मोहीम यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

एप्रिलअखेर एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 4468 इतकी होती. ती १३ मेपर्यंत 3158 पर्यंत कमी झाली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. एप्रिलअखेर 14 हजार 328 रुग्ण बरे झाले होते. ही संख्या आज 19 हजार 566  वर पोहचली आहे. ही बाब दिलासादायक असली तरी नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे याचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.