• स्वातंत्र्यदिनी आदिम वस्तीवर अनोखे आंदोलन
चंद्रपूर : आदिम समुदायाची वस्ती असलेल्या जिवती तालुक्यातील घोडणकप्पी येथे गावाला जोडणारा रस्ता नाही की पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. प्रचंड गैरसोयीचा सामना करीत येथील कोलाम व गोंड समुदायांचे कुटूंब विषण्ण जीवन जगत आहेत. या वस्तीवरील माणसांच्या विकासाचे आणि परिवर्तनाचे प्रयत्न सरकारी दफ्तरातील फोटो आणि फाईलीत केव्हाच बंद पडलेत. अखेर सरकार रस्ता करून देत नाही म्हणून हतबल होण्याऐवजी स्वतः हातात कुदड-फावडा घेऊन डोंगर पोखरून रस्ता निर्मीतीचा निर्धार येथील आदिम समुदायांनी केला आहे.
माणिकगड पहाडावरील कोलाम समुदायांच्या हक्कासाठी लढणा-या कोलाम विकास फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष विकास कुंभारे यांचे नेतृत्वात जिवती तालुक्यातील शेकडो आदिम एकत्र येऊन घोडणकप्पीच्या प्रश्नासाठी लढा उभारणार आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी येथील निसर्गरम्य परीसरात तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा जागर केला जाणार आहे. व यानंतर रस्ता निर्मीती करण्यासाठी कोलामांचे हजारो हात एकवटणार आहेत. स्वातंत्र्यपुर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या या वस्तीला जोडणारा रस्ता आणि पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याने शासनाच्या विकासाच्या दाव्याची येथे पोलखोल झाली आहे. आदिम कोलाम व गोंड समुदायाचे सुमारे पंचेविस कुटूंब येथे वास्तव्यास आहेत. आता ही वस्ती दोन भागात दुभंगली आहे. गडचांदूर वरून पाटण मार्गे नागमोळी वळणाने माणिकगडचा डोंगर चढत पुढे गेल्यावर सितागुडा, आंबेझरी, नंदप्पा, पिटीगुडा, शंकरपठार ह्या वस्त्या पार करीत अगदी शेवटच्या टोकावर एक भग्न वस्ती दिसते. ती घोडणकप्पी कोलामगुडा. घरांच्या भिंतीचे सांगाळे एका रांगेत सजवून ठेवल्यासारखे. या सांगाळ्यांच्या गर्दीतच एखाद्या घरकुलावर टिनाचे आच्छादन झाकून भयग्रस्त कोलाम आपले जीवन व्यतीत करीत आहेत. कलेक्टर, सिईओ, एसडीओ, तहसिलदार, बिडीओ किंवा प्रकल्प अधिकारी अशा वरीष्ट अधिका-यांना हे गाव लांबच आहे. पण, गावाचा गोषवारा बाळगणारे पटवारी आणि ग्रामसेवकही वस्तीकडे फिरकण्याची तसदी घेत नाही आणि विशेष बाब म्हणजे, आपले प्रश्न सोडविण्यासाठी कुणी इकडे फिरकावेत याबाबत ग्रामस्थांनाही फारशी अपेक्षा नाही. अज्ञानाच्या अंधकारात गडप झालेल्या या वस्तीची चाहुल आमदार-खासदारांनाही फारशी नसावी.
अनेक वर्षांपुर्वी डोंगराखालच्या मुख्य वस्तीला आग लागून घरे जळून खाक झाली. त्या सुमारास डोंगरमाथ्यावर कोलामांसाठी घरे बांधण्यात आली. पण, वस्तीपर्यंत पाणी पोचविण्याचा प्रयत्न झाला नाही. येथील कोलामांना डोंगरावरून सुमारे सहाशे फुट खाली उतरून वाहत्या नाल्यातून पाणी आणावे लागते. त्यापेक्षा डोंगराखाली असलेल्या शेतातच झोपडी उभारून राहणे अधिक सोयीचे ठरेल म्हणून सहा कुटूंबानी वस्तीच सोडली. काहीजन पाण्याच्या त्रासाने इतरत्र पलायन केले. पाच-सहा कुटूंब वस्तीत स्थीरावले. याच वस्तीचा दुसरा भाग असलेल्या गोंडगुड्याची अवस्थाही मन हेलावून टाकणारी आहे. डोंगर उतरून निसरड्या पायवाटेने या वस्तीपर्यंत पोचावे लागते. स्वातंत्र्याच्या चौ-याहत्तर वर्षात या वस्तीला रस्त्याने जोडले गेले नाही. डोंगरमाथ्यावर असलेली शाळा गाठण्यासाठी चिमुकले विद्यार्थी पायवाटेने डोंगर चढतात. पेशन्टला खांद्यावर उचलून न्यावे लागते. येथे पिण्याच्या पाण्याची सोयही नाही. गावाजवळून वाहणा-या नाल्यात एक फुटकी विहीर आहे. या विहीरीत पाणी कमी आणि गाळच जास्त भरलेला आहे. म्हणून गावातल्या महिला नाल्यातल्या पात्रात खोल खड्डा करून शुध्द पाणी झिरपण्याची वाट बघत बसतात. खड्डा पाण्याने भरला की लहानश्या भांड्याच्या सहाय्याने आपली चरवी भरून घेतात. सन 2013 या वर्षात गावातील काही कुटूंबांसाठी घरकुल मंजूर करण्यात आले. यात बिरसाव वलके, मंगू मडावी, बापुराव गेडाम, शामराव मडावी, तानु जुमनाके, रघुराम जुमनाके, चिन्नु उरवते, इसरू मडपची, जलपती गेडाम यांचा समावेश आहे. यापैकी रघूराम जुमनाके मृत पावले असून, त्यांचे वारस जैतु जुमनाके या घरकुलाच्या प्रतिक्षेत आहे. नाही म्हणायला घरकुलाचा पहीला हप्ता खात्यात जमा झाला. काही जणांच्या घरकुलाचे पायवाही बांधून झाला. शेतातील बियाण्यांना अंकूर फुटावे त्याप्रमाणे काही घरकुलांच्या भिंतीही डोकावू लागल्या. पण, हे काम थांबले. कुणी कधी येऊनही बघीतलेले नाही. आता ताटव्यांच्या भिंती उभारून येथील माणसे आपल्या कुटूंबासह राहत आहे.
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या वस्तीपर्यंत जाण्यासाठी आतापर्यंत रस्ता का मिळाला नाही, याबाबत अधिका-यांकडेही उत्तर नाहीत. खरं तर घोडणकप्पी नावाची वस्ती डोंगराच्या पलीकडे आहे याची फारशी माहितीच अनेक अधिका-यांना नाही. डोंगराखाली असलेल्या गोंडगुड्यातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना डोंगरावरच्या कोलामगुड्यावर असलेल्या शाळेपर्यंत येण्यासाठी आवश्यक रस्ता ‘प्लॅनिंग’ मध्येच नाही. पायांत गोळे यावेत एवढ्या कठीण वाटेवर दररोज सकाळी घंटा वाजायच्या आत चिमुकल्यांना पाठीवर पुस्तकाचा बस्ता घेऊन शाळेची वाट धरावी लागते. पहील्या वर्गात शिकणारा दौलत गेडाम, चवथ्या वर्गातील अनिता शेकु गेडाम, लच्चू मंगू मडावी व क्रिष्णा सिताराम कोडापे आणि पाचव्या वर्गातील अंजू यशू कुमरे, झारू सिताराम कोटनाके या लहानग्या विद्यार्थ्यांना दररोज जवळपास सहाशे फुट उंच डोंगर चढून काट्या-गोट्याच्या वाटेने आपली शाळा गाठावी लागते. एखाद्या जुलमी व्यवस्थेने अनन्वित अत्याचार करून शरीराचे प्रत्येक अवयव ओरबाडून काढावे व छिन्नविछिन्न झालेले शरीर गर्द अंधाराच्या खाईत लोटून द्यावे अशी अवस्था घोडणकप्पी या वस्तीची झालेली आहे. येथील मुलभूत सोयी- सुविधांची दखल आतापर्यंत प्रशासनाने घेतलेली नाही. गावातल्या लोकांना घरकुल नाहीत की लहान बालकांसाठी आंगणवाडीची सुविधा नाही.
कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी गावक-यांची बैठक घेऊन येत्या स्वातंत्र्यदिनी स्वतः रस्ता निर्मीती करून त्या रस्त्याचे सरकारार्पण करण्याचे अनोखे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात माणिकगड पहाडावरील आदिम समुदाय एकवटणार असून, घोडणकप्पीच्या रस्त्याच्या निर्मीतीसाठी हजारो हात काम करणार आहेत.
या आंदोलनात सहयोगी संस्था म्हणून पाथ फाऊंडेशन, गुरूदेव सेवा मंडळ, मराठा सेवा संघ, स्वरप्रिती कला अकादमी, नेफेडो, तनिष्का व्यासपिठ व अन्य सामाजिक संस्था सहभागी होत आहेत.