• खासदार बाळू धानोरकर निर्देशानुसार मंजूरी
• कोरोना काळात वाढत्या मृत्यूनंतर मनपाचा निर्णय
चंद्रपुर : शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. दिवसाला १० चा वर कोरोना बाधितांचा मृत्यू होत आहे. मृतांच्या अंत्यसंस्कार विधीकरीता असलेल्या स्मशानभूमीत व्यवस्था अपुरी पडत आहे. अंत्यविधी पार पाडायला अडचण होते, विलंब होतो. तसेच यावेळी घ्यावी लागणारी विशेष काळजी तथा उपाययोजनांचा फटका नातेवाइकांसह प्रशासनाला बसत आहे. त्यामुळे शहरात एल. पी. जी. शवदाहिनी लावण्याची सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्याकडे केली होती. त्याची तात्काळ दखल घेत एक कोटी दोन लक्ष ८७ हजार १५० रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. आता लवकरच चंद्रपूर शहरात एल. पी. जी शवदाहिनीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस वाढत आहे. यामध्ये उपचार घेत असताना कोरोना बाधितांच्या मृत्यू देखील होत आहे. यामध्ये मृत्यू होणाऱ्या बाधितांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. महानगर पालिका प्रशासनातर्फे या मृत्यू पावलेल्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यामुळे एल. पी. जी. शवदाहिनी शहरात लावल्यामुळे अंत्यविधी करतांना उत्पन्न होणारे अनेक प्रश्न सुटणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या शवदाहिनी लावण्यात आल्या आहे. चंद्रपुर वाढत्या लोकसंख्येचे शहर असल्याने याचा फायदा कोरोणा आपात्कालीन काळात व इतर वेळीही होणार आहे. माणसाच्या मरनोपरांत त्याच्या देहाची विटंबना होवू नये, नातेवाईक व प्रशासनाला त्रास होवू नये, याकरिता शवदाहिनी शहरात लवकर उपलब्ध करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांना दिल्या होत्या. त्याची दखल घेत त्यांनी याबाबतीत प्रशासकीय बाबी पूर्ण करून जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच शहरात एल. पी. जी. शवदाहिनीची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.