• व्हेंटीलेटरच्या खाटेसाठी वणवण भटकले
चंद्रपूर : महानगरातील एका बाधितासह त्याचे नातेवाईक गुरूवारी रात्री तब्बल पाच तास ऑटोतून व्हेंटीलेटरच्या खाटेसाठी वणवण भटकले. पण खाट उपलब्ध झाली नाही. अखेर शुक्रवार १६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास या बाधिताचा मृत्यू झाला.
महानगरातील स्वावलंबी नगर परिसरातील रहिवासी किसन पोहाणे हे दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाले. नातेवाईकांनी त्यांना दुर्गापूर परिसरातील डॉ. गेडाम यांच्या खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांना व्हेंटीलेटरची गरज होती. त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रूग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. लगेच नातेवाईकांनी ऑटोने सामान्य रूग्णालय गाठले. पण तिथेही ‘व्हेंटीलेटर’ची खाट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी अन्य खासगी रूग्णालयात धाव घेतली. तब्बल पाच तास शहरातील अन्य खासगी रूग्णालयात भटकंती केली. पण, अखेरपर्यंत त्यांना व्हेंटीलेटर मिळाले नाही. शेवटी त्याची प्राणज्योत मालावली.
सामान्य रूग्णालयात बाधित दाखल केला असता, तेथील आरोग्य अधिकार्यांनी रूग्णाची साधी तपासणी केली नाही. खाटाच उपलब्ध नसल्याचे सांगून रूग्ण दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. ‘व्हेंटीलेटर’ खाट उपलब्ध करून दिली असती तर जीव वाचला असता. सामान्य रूग्णालयातील जबाबदार अधिकार्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी रूग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.