चंद्रपूर जिल्हा परिषदेत नोकरीच्या बनावट आदेशप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची संगणकीकृत स्वाक्षरी वापरून दीले होते नोकरीचे बनावट आदेश

चंद्रपूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागात वर्ग-3 च्या नोकरीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची संगणकीकृत स्वाक्षरी वापरून नोकरीचे बनावट आदेश दिल्याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीरतेने दखल घेत ब्रिजेशकुमार बैद्यनाथ झा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍यांपासून युवक-युवतींनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी बुधवारी केले आहे.

कोरोनाकाळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असून, मिळेल ते काम युवक करण्यासाठी तयार होत आहेत. दरम्यान, बल्लारपूर येथील सरदार पटेल वॉर्डातील रहिवासी ब्रिजेशकुमार बैद्यनाथ झा याने काही युवकांना आपल्या जाळ्यात ओढून जिल्हा परिषदेतील कनिष्ठ साहाय्यक व परिचराच्या नोकरीचे बनावट आदेश माथी मारले. जिल्हा परिषदेत या प्रकारची कोणतीही भरती प्रक्रिया राबविली गेली नसताना 2019-20 या आर्थिक वर्षात तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची संगणकीकृत स्वाक्षरी चोरून हे आदेश तयार करण्यात आले आहे. हातात नियुक्ती आदेश असल्याने 9 सप्टेंबर रोजी दोन ते तीन युवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट घेवून बनावट आदेश दाखविल्यानंतर त्यांनाही धक्काच बसला. बनावट आदेश देवून फसवणूक झालेले आणखी 20 ते 22 युवक असल्याची माहिती त्या युवकांनीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलीे. हा फसवणूकीचा प्रकार बल्लारपुरातील झा नामक व्यक्तीने हा गोरखधंदा केल्याचेही सांगितले. दरम्यान, याप्रकरणाची बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली असून, रामनगर पोलिसांनी झा याच्याविरूद्ध भादंवी 465, 468, 471, 420 कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार मधुकर गिते यांनी दिली.