चंद्रपूर : सचिन वाझे प्रकरणावरून अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारने हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. परमबीर सिंग यांची या पदावरून उचलबांगडी करून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. भद्रावतीचे सुपू्त्र, भदा्रवती भूषण ते मुंबई पोलिस आयुक्त असा त्यांचा प्रवास सुरू आहे.
हेमंत नगराळे भद्रावतीचे सुपूत्र
हेमंत नामदेव नगराळे यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे झाला. भद्रावतीतील जिल्हा परिषद शाळेतून त्यानी सहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर नागपूरमधील पटवर्धन हायस्कूलमधून त्यांनी पुढील शिक्षण घेतले. नागपूरच्या व्हीआरसीईमधून अभियांत्रिकीची पदवी त्यांनी घेतली. तर मुंबईतील जेबीआयएमएसमधून वित्त व्यवस्थापनात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. हेमंत नगराळे यांचे वडिल मध्यप्रदेशात पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. मुळचे भद्रावती येथील हेमंत नगराळे यांनी,आयुध निर्माणी भंडारा येथे असिस्टं वर्क्स मॅनेजर नोकरीला सुरूवात केली. 1987 मध्ये ते आयपीएस अधिकारी म्हणून रूजू झाले. त्यांनतर राजूरा येथे नक्षलक्षेत्रासाठी त्यांची स्पेशल नियुक्ती करण्यात आली.
हेमंत नगराळे भद्रावतीचे भूषण
त्यांना आतापर्यंत अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. भद्रावती नगरपरिषदेद्वारे त्यांना भद्रावती भूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पुरस्कार घेण्यासाठी ते जेव्हा भद्रावती येथे आले होते तेव्हा त्यांनी भद्रावती भूषण पुरस्कार स्विकारला. त्या क्षणी त्यांनी बालमित्रांसोबत वेळ देऊन बालआठवणींना उजाळा दिला. बालमित्र राजू मुरलीधर गुंडावार यांचे घरी अन्य बालमित्रांसोबत वेळ देऊन बालमित्रांच्या आठवणी ताज्या केल्या. बालपणी ज्या मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतले त्या जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या. ज्या वर्ग खोल्यात ते बसत होते. वर्ग खोल्यांची पाहणी केली होती. शाळेत शिकत असताना ज्यांच्यावर शाळेची प्रार्थना व राष्ट्रगित म्हणण्याची जबाबदार होती. त्यांच्यामध्ये सुरूवातीपासून राष्ट्रसेवा करण्याची जिद्द होती, अशी माहिती बालमित्र राजू गुंडावार यांनी या निमित्याने माहिती दिली आहे. भद्रावती येथे शिवाजीवार्डात रेल्वे लाईनलगत त्यांचे घर होते.त्यांनी हे घर विकून आता त्यांनी नागपूरात घर घेतले आहे.
महाराष्ट्र केडरच्या 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे हे महाराष्ट्र केडरच्या 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 1989 ते 1992 दरम्यान ते चंद्रपुरातील राजुरामध्ये एएसपी म्हणून पहिली पोस्टींग त्यांना मिळाली होती. 1992 ते 1994 दरम्यान सोलापूरमध्ये उपायुक्त म्हणून ते कार्यरत राहिले. बाबरी विध्वंसानंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळल्याबद्दल त्यांचे चांगले कौतुक झाले होते. 1994 ते 1996 दरम्यान रत्नागिरीत ते पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी दाभोळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे प्रकरण हाताळले.1996 ते 1998 दरम्यान ते सीआयडी गुन्हे शाखेत पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.अंजनाबाई गावित बालक अपहरण आणि हत्या प्रकरणाचा गुंता सोडविण्यात नगराळेंची महत्वाची भूमिका राहिली.1998 ते 2002 दरम्यान त्यांनी सीबीआयमध्ये सेवा दिली.
यादरम्यान अनेक महत्वाची प्रकरणे त्यांनी हाताळली. केतन पारेख घोटाळा, माधौपुरा सहकारी बँक घोटाळा, हर्षद मेहता घोटाळ्याची प्रकरणे त्यांनी हाताळली.2007 ते 2008 दरम्यान मुंबई अतिरिक्त पोलीस आयुक्त(पूर्व) म्हणून त्यांनी काम पाहिले.2008 ते 2010 दरम्यान एमएसईडीसीएलच्या दक्षता आणि सुरक्षा विभागात विशेष महासंचालक आणि संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.2014 मध्ये काही काळ त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळला.2016 ते 2018 दरम्यान नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून ते नियुक्त होते.2018 नंतर त्यांची महासंचालक पदी बढती झाली. फॉरेन्सिक प्रयोगशाळेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.