चंद्रपूर : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत महाआवास अभियान २०२०-२१ अंतर्गत कोरपना तालुक्यातील बिबी व पिपरी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. १५ ऑगस्टला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत घरकुलांच्या कामाला गती येण्याकरिता संपूर्ण राज्यात महाआवास अभियान शासनस्तरावर राबविण्यात आले आहे. या अभियानांतर्गत विविध स्तरावर पुरस्कार ठेवण्यात आले. त्यामध्ये कोरपना तालुक्यातील बिबी व पिपरी अशा दोन ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याने कोरपना पंचायत समितीचे नावलौकिक वाढले आहे.
पुरस्कार वितरण पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते झाले. बिबी ग्रामपंचायतच्या वतीने माजी सरपंच मंगलदास गेडाम, माजी उपसरपंच आशिष देरकर, ग्रामपंचायत बिबीचे प्रशासक तथा सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी दिलीप बैलनवार, ग्राम विकास अधिकारी एस. एन. ढेंगळे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अजय सुरेश लांडगे, पिपरीच्या सरपंच रुंदा विजय कुंभारे, सचिव एन. एम. शाहा यांनी स्वीकारला. पुरस्कार विजेत्यांनी यशाचे श्रेय संवर्ग विकास अधिकारी बाबाराव पाचपाटील, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी दिलीप बैलनवार, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अजय सुरेश लांडगे व लाभार्थ्यांना दिले आहे.