उपचारा विनाच कोरोना बाधित रुग्णाचा ब्रह्मपुरीत तडफडून मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• ब्रम्हपुरी मध्ये ना बेड ! ना ऑक्सीजन !!
• पालकमंत्री वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील दुर्दैवी घटना

चंद्रपूर : ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद दवाखान्यालगत असलेल्या प्रवाशी निवार्‍यात एका 50वर्षीय कोरोना बाधित इसमाचा उपचारअभावी तडफडून मृत्यू झाला.ही दुर्दैवी घटना आज रविवारी (18 एप्रिल) ला सकाळी घडली आहे. गोविंदा बळीराम निकेश्वर (५०) असे मृताचे नाव असून तो नागपूर जिल्ह्यातील कूही तालुक्यातील आंबोरा येथील निवासी होता.
कूही तालुक्यातील आंबोरा निवासी गोविंदा बळीराम निकेश्वर हा कोरोना बाधित असल्याने आणि प्रकृती बिघडत असल्याने त्याला येथील डॉक्टरांनी काल शनिवारी ब्रह्मपुरी येथे रेफर केले होते. सदर इसमाची पत्नी खाजगी वाहनाने ब्रह्मपुरी येथे आली होती. मात्र ब्रह्मपुरी ख्रिस्तानंद रूग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्याला भरती होता आले नाही. येथील रुग्णालयात उपचारासाठी ना बेड, ना ऑक्सीजन त्यामुळे त्याच्यावर उपचार होऊ शकले नाही. इतरत्र धावपळ करूनही उपचार होऊ शकले नाही. हताश झालेली मृतकाची पत्नी ब्रह्मपुरी ख्रिस्तानंद चौकातील प्रवाशी निवारा येथे पतीला रात्रभर घेऊन होती. आज रविवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान त्या इसमाचा उपचारा विना प्रवासी निवा-यातच तडफडून मृत्यू झाला. प्रशासनाला माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले लगेच सर्व यंत्रणेला पाचारण करून मृत बाधित इसमावर अंत्यविधी करण्यात आले आहे.

ब्रह्मपुरी तालुका हा पालकमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे. या तालुक्यात भागात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र स्थानिक नगर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही आपल्या विधानसभा क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. मागील एका आठवडाभरात 529 कोरोना बाधित निघाल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. अशातच उपचाराअभावी एका रुग्णाचा उपचाराअभावी ब्रह्मपुरीत मृत्यू झाल्याची घटना स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य सुविधेचे धिंडवडे काढणारी ठरली आहे.