महानगरपालिकेच्या ‘आसरा’ कोविड हॉस्पिटलचे लोकार्पण
चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरली म्हणून बेसावध राहू नका. कारण तिसरी लाट तोंडावर आहे. येथे भरती होणारा रुग्ण बरे होऊन परत जाताना जीवनाचा तंत्रमंत्र आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन जाईल, असा आशीर्वाद माता महाकालीने द्यावा. मनपाचे नवनिर्मित रुग्णालय तिसऱ्या लाटेत रुग्णांसाठी ‘आसरा’ ठरेल, असे प्रतिपादन लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महानगरपालिकेच्या ‘आसरा’ कोविड हॉस्पिटलचे लोकार्पण मंगळवार, दि. १८ मे रोजी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आभासी पद्धतीने अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजय वडेट्टीवार होते. यावेळी प्रमुख अतिथी राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे आभासी पद्धतीने सहभागी झाले. कार्यक्रमाला मंचावर खासदार बाळू धानोरकर, महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, सत्ता पक्षनेता संदीप आवारी, गटनेता सुरेश पचारे, डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक सर्वश्री अनिल फुलझेले, संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोटुवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रेय आदी उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर महानगरपालिकेने नेहमीच उत्तम काम केले आहे. अमृत योजनेचे काम प्रशंसनीय आहे. मागच्या वर्षीच्या कोरणाच्या संकटात घरोघरी डब्बे देण्याचे काम महानगरपालिकेने करून माणुसकी जपली. आता आरोग्यासाठी उत्तम काम करण्याच्या दृष्टीने नियोजन करा आणि भविष्याच्या दृष्टीने बालरुग्णालय सुरु करा, असे सूचित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इतर मागास बहुजन कल्याण, आपत्ती व्यवस्थापन तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मनपाच्या नवनिर्मित रुग्णालयाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले आज कोरोना रुग्णाची संख्या कमी होत असली तरी येणारी तिसरी लाट भयंकर आहे. या संदर्भात अनेक तज्ञांनी मत नोंदविले आहे. हे विश्वव्यापी संकट आले आहे. हे थोपवून लावण्यासाठी मनपाने रुग्णालय सुरु करून मोठे कार्य केले आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने हे रुग्णालय फायदेशीर ठरेल, अशी आशा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे म्हणाले, चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रुग्णांसाठी अत्यंत सुसज्ज हॉस्पिटल अत्यंत कमी वेळेत चांगली सेवा रुग्णांना देण्यासाठी सज्ज करण्यात आले. तिसरा लाटेमध्ये लहान मुलांना धोका उद्भवू शकतो, तर त्यासाठी देखील आपण तयारी केली तर अधिक चांगले होईल. राज्य सरकारतर्फेदेखील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.
महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, मागील वर्षी २२ मार्च रोजी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून उपासमारी होणा-या नागरिकांना जेवणाचे डब्बे, गरिबांना अन्नधान्य किट, दिव्यांग व्यक्तींच्या खात्यात ७५० रुपये, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना विलीगीकरण व्यवस्था, २५ लसीकरण केंद्र, कोरोना चाचणी केंद्र सुरु केले. शहरच नव्हेतर जिल्ह्यातील नागरिकांसाठी कोव्हीड केअर सेंटर सुरु केले. महानगरपालिका युद्धपातळीवर काम करीत आहे. वन अकॅडमी, सैनिक स्कुल च्या माध्यमातून रुग्णांना एक चांगली सुव्यवस्था आपण देऊ शकलो. तिथे सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्याचे काम महानगरपालिका करीत आहे. कोव्हीड रुग्णालयाच्या माध्यमातून सेवेतील एक उणीव भरून निघाली आहे. आता आपण कुठेही कमी नाही. सुसज्ज व सुव्यवस्थित हॉस्पिटलमध्ये सर्वसोयी सोयी उपलब्ध असून, रुग्णांची कोणतीही गैरसोया होणार नाही, असा विश्वास महापौरांनी दिला.
महानगरपालिकेने जागा हस्तांतरित करून मोठा हॉस्पिटल तयार होऊ शकते. त्या माध्यमातून तीन दिवसाच्या मुलांपासून तर सतरा-अठरा वर्षाच्या मुलांपर्यंत उपचार करता येईल, असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले. यावेळी मान्यवरांनी रुग्णालयाची पाहणी केली. पुरुष, महिला कक्ष, आयसीयू, जनरल वॉर्ड, ऑक्सिजन बेड बघून मनपाचे कौतुक केले. प्रास्ताविक आयुक्त राजेश मोहिते यांनी केले, तर संचालन बबिता उईके यांनी केले. यावेळी उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांच्यासह सर्व आमदार, नगरसेवक, अधिकारी वर्ग आभासी पद्धतीने उपस्थित होते.