महिला गंभीर जखमी; गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती
चंद्रपूर : तेंदु संकलन करण्याकरिता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज दि.18 रोजी सकाळच्या सुमारास घडली. सदर महिला सावली तालुक्यातील गेवरा येथील रहिवासी असून शकुंतला दिवाकर चौधरी (50) असे जखमी महिलेचे नाव आहे.
सध्या ग्रामीण भागात तेंदु संकलन करण्याचा हंगाम सुरू आहे. गावातील महिला सोबत सदर महिला तेंदु संकलन करण्याकरिता गोसेखुर्दच्या मुख्य नहराकडे गेली होती. त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर अचानक हल्ला केला. सोबतीला असणाऱ्या महिलांनी आरडाओरड करून वाघाला हाकलून लावले व सदर महिलेची वाघाच्या तावडीतून सुटका केली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळ गाठून चौकशी करून जखमी महिलेचा अंतरगाव येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सावली तालुका जंगलव्याप्त असल्याने या परिसरात हिंस्र पशु चा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून जंगलातील पाणवठ्यावर पाणी नसल्याने जंगलातील हिंस्त्र पशू पाण्याच्या शोधासाठी गावाच्या दिशेने येत असल्याचे चित्र आहे. मात्र अशा गंभीर बाबीकडे सावली येथील वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असून शेतकरी व मजूर वर्ग भयभीत झालेला आहे.