धान उत्‍पादक शेतक-यांना बोनस तातडीने प्रदान करावा अन्यथा आंदोलन :

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• माजी अर्थमंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांचा राज्यसरकारला इशारा

चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतक-यांना देण्‍यात येणाच्या बोनसची रक्कम अद्याप प्रदान केलेली नाही.. त्‍यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्‍हयातील धान उत्पादक शेतक-यांवर अन्‍याय होतो आहे. सध्‍या शेतीची कामे सुरु झाली असुन बी-बीयाणे, खते व इतर शेतीविषयक साधने खरेदी करावयास व शेतीकामास शेतक-यांना पैश्‍यांची गरज असताना त्‍यांच्‍या हक्‍काचे बोनस शासनाद्वारे देण्‍यात येत, नसल्‍यामुळे धान उत्‍पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. येणाऱ्या सात दिवसांच्‍या आत धान उत्‍पादकांना बोनस न मिळाल्‍यास भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्याचा इशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

महाराष्‍ट्र शासनाद्वारे धान उत्‍पादक शेतक-यांना एप्रिल महिन्‍यामध्‍येच त्‍यांच्‍या हक्‍काचे बोनस मिळणे अपेक्षित होते. पण जुन महिन्‍याचा मध्‍य उलटून गेला असताना अद्याप बोनस मिळालेले नाही. त्‍याच प्रमाणे शासनाद्वारे खरेदी करण्‍यात आलेल्‍या धानाचे पैसे सुद्धा ब-याच शेतक-यांना मिळालेले नाही. शासनाद्वारे बिजाई पुरवठा करण्‍यात येतो. तो देखील अनेक शेतक-यांना मिळालेला नाही आहे. त्‍यामुळे गरिब शेतक-यांना खाजगी दुकानातुन महागात बिजाई खरेदी करावी लागत आहे. यामुळे त्‍यांचे आर्थिक शोषण होत आहे. या बोनसपोटी शेतकऱ्यांचे 800 कोटी रू शासनाकडे थकीत आहे , एकीकडे वीजबिल थकीत आहे म्हणून सरकार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करते आणि दुसरीकडे त्यांच्या हक्काचे बोनसचे पैसे थकीत ठेवते हा सापत्न भाव का ? असा सवाल आ. मुनगंटीवार यांनी केला आहे .

सध्‍या शेतीचे कामे सुरु झाले असताना गोरगरिब शेतक-यांना शेतीविषय साहित्‍य खरेदीसाठी व शेतीकामासाठी पैश्‍यांची गरज असते. मात्र ऐन हंगामात शासनाकडून बोनस देण्‍यात आले नसल्‍यामुळे गोरगरिब शेतक-यांवरती अन्‍याय होत आहे. शासन शेतक-यांची आर्थिक कोंडी करुन त्‍यांच्‍यावरती अन्‍याय करीत आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे .भाजपा हा अन्‍याय कदापीही सहन करणार नाही. त्‍यामुळे शेतक-यांच्‍या हक्‍काचे बोनस तात्‍काळ न दिल्‍यास येत्‍या भारतीय जनता पार्टी द्वारे चंद्रपूर जिल्‍हयात तिव्र आंदोलन करुन शेतक-यांना न्‍याय मिळवुन देण्‍यात येईल असे आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.