वेकोलिच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला

घुग्घुस येथील घटना, हल्लेखोर दोघांना अटक

घुग्घुस : वेकोलिच्या कोळसा खाण परिसरातील बंकर परिसरात फिरणाऱ्यास हटकणाऱ्या सुरक्षा रक्षकास दोघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना रविवारी (ता. १७) सकाळी साडेआठच्या सुमारास येथे घडली. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली. बल्लू उर्फ मोहम्मद सदाफ (वय २३), रजनीकांत उर्फे भोला गिरी (वय २०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.

भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील वैभव दामोधर निमकर हा घुग्घुस येथे वेकोलित सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत आहे. रविवारी सकाळी तो घुग्घुस येथील वेकोलिच्या उपक्षेत्रीय सुरक्षा कार्यालयात कर्तव्याकरिता आला होता. वैभव GOC – CHP बंकर येथे कर्तव्यावर होता. यादरम्यान बल्लू उर्फ मोहम्मद सद्दाफ, रजनीकांत उर्फ भोला गिरी हे दोघे बंकर जवळ येताना दिसले. त्यामुळे वैभव निमकर याने दोघांना हटकले. बंकर परिसरात फिरण्यास मनाई केली. त्यामुळे दोघांनी चिडून जाऊन दोघांनी सुरक्षारक्षक वैभव निमकर याला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली. पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यास बघून घेण्याची धमकी देत तेथून ते निघून गेले. दरम्यान, सुरक्षा रक्षक वैभव निमकर यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून सायंकाळी अटक केली.

पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय सिंग करीत आहे. यापूर्वी ही वेकोलिच्या सुरक्षा रक्षकावर हल्ले करण्यात आले आहे.