• दिवसभर दवाखाने फिरले पण बेड मिळाला नाही
चंद्रपूर : येथे रुग्णालयाच्या चकरा घालूनही बेड न मिळाल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाचा स्वतःच्या गाडीत मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. उपचार न मिळाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी येथे प्रवासी निवा-यातच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कोरोना स्थितीची भीषणता अधोरेखित करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. उपचारांअभावी 40 वर्षीय व्यक्तीने कारमध्येच प्राण सोडले. प्रविण दुर्गे असे मृताचेआनाव असून तो चंद्रपूर मधील नगीनाबाग येथील रहिवासी होता.
चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या 40 वर्षीय प्रविण दुर्गे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दुर्गे हे चंद्रपूर शहरातील नगीनाबाग परिसरात वास्तव्याला होते. प्रकृती बिघडल्यानंतर काल (रविवारी) ते नातेवाईकांसह रुग्णालयात दिवसभर फिरत होते. उपचार आणि बेड मिळावा यासाठी ते अनेक रुग्णालयांमध्ये फेऱ्या मारत होते. दिवसभर वणवण झाली पण बेड मिळाला नाही.
अखेरपर्यंत प्रवीण दुर्गे यांना कुठेही उपचार किंवा बेडची सुविधा मिळाली नाही. शेवटी आज सोमवारी पहाटे आपल्या अल्टो गाडीतच त्यांचा मृत्यू झाला. दुर्गेंच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी शासकीय कोव्हिड रुग्णालय परिसरातच टाहो फोडला.
लागोपाठ दोन दिवस चंद्रपुरात बेडअभावी मृत्यू
दुसरीकडे, उपचार न मिळाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बस स्थानकावरच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना कालच घडली होती. ब्रम्हपुरी शहरातील गोविंदा निकेश्वर (50) यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना जिल्ह्यातील आंभोरा येथून ब्रम्हपुरी येथील कोविड रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तिथेही बेड शिल्लक नव्हते. अखेर त्याचाही उपचाराअभावी प्रवासी निवा-यातच मृत्यू झाला.