चालकाचे नियंत्रण सुटले आणि आठवडी बाजारात कार घुसली

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

एकाचा मृत्यू तर चार जण जखमी

चंद्रपूर : भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सावली येथील आठवडी बाजारात कार घुसल्याने एकाचा मृत्यू झाला तर चार गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी (दि 21) रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास सावली येथे घडली. मार्कंडी शंकर मोहूर्ले (70) रा. खेडी असे मृतकाचे नाव आहे. दशरथ कावरु रा. सिंदोळा (60), सोमेश्वर डोमाजी मोहूर्ले (36) रा. कापसी हे गंभीर तर कांताबाई बिबीशन कन्नाके (53)रा. किसाननगर, छायाबाई राजू काले (55) रा. मुल आदी किरकोळ जखमीचे नाव आहेत. गंभीर जखमी झालेल्या अपघात ग्रस्तांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, एम एच 34 ए 0375 ही चारचाकी मारुती कार सिंदोळा मार्गावरून सावलीकडे येत होती. आज मंगळवारी सावली येथील आठवडी बाजाराचा दिवस असल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. प्रत्यक्षदर्शी च्या सांगण्यावरून कार भरधाव वेगाने असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व कारने फळांच्या रिक्षाला धडक देऊन पाच नागरिकांना चिरडले. पाचही जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा दाखल भरती करण्यात आले. खेडी येथील मार्कंडी शंकर मोहूर्ले याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला तर गंभीर जखमींना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्त लिहे पर्यंत चालकास अटक झालेली नव्हती. पुढील तपास सावलीचे ठाणेदार शिरसाट यांच्या मार्गदर्शनात सहा. फौज. बोधे, लाटकर, वाहतूक विभागाचे सहा. फौज. बोल्लीवार, वाहतूक शिपाई विशाल दुर्योधन करीत आहेत.

सावलीत रस्त्यावर भरतो बाजार

सावली हे तालुक्याचे ठिकाण आहे. ग्रामीण भागातील नागरिक आठवडी बाजाराकरिता येथे येतात. येथील आठवडी बाजार सावली – हरांबा मार्गावर भरतो. आठवडी बाजाराच्या दिवशी प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना तसेच बाजार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी लहान-मोठे अपघात सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराच्या नियोजित जागेवरच बाजार भरविण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous article‘All Soul’s Day’ निमित्त काँग्रेस तर्फे कब्रस्थान स्वच्छता कार्यक्रम
Editor- Manoj kumar Kankam 9823945554/ 9423845554