चंद्रपुरातील हृदयद्रावक घटना : ऑक्सिजन बेड न मिळाल्याने ‘त्या’ वृद्धाने घेतला झाडाखाली अखेरचा श्वास

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• मृतक होता चंदनखेडा येथील रहिवासी
• बेड अभावी मृत्यू झाल्याची जिल्ह्यात पाचवी घटना

चंद्रपूर : कोरोना बाधित झाल्यामुळे चंद्रपुरात उपचारासाठी आलेल्या एका 65 वर्षीय वृद्धाला वेळेवर ऑक्सीजन बेड न मिळाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील झाडाखालीच त्याला प्राण सोडावे लागले.ही हृदयद्रावक घटना आज गुरूवारी (२२ एप्रिल) ला दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. सदर मृतक हा भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील रहिवासी होता.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळणं कठीण झाले आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण वाढला आहे. चंद्रपूर ह्या परिस्थितीला अपवाद नाही. येथेही बाधित आणि मृत्यूचा उच्चांकी आकडा दरदिवशी पुढे येतो आहे. आठवडाभरात दोघांचा बेड न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज गुरुवारी परत ऑक्सिजन बेड न मिळाल्याने एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला.

भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील रहिवासी वृद्ध बापू कपकर हे कोरोना बाधित झाल्यामुळे आणि प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला आज गुरुवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्या वृध्दासोबत त्याची म्हातारी पत्नी सोबत होती. त्या वृद्धाचे दुर्दैव असे की त्याला तब्बल पाच तास उपचारासाठी बेड मिळाला नाही. त्यामुळे तो वृध्द जिल्हा रूग्णालयातील एका झाडाखाली उपचारासाठी पत्नीसह ताटकळत होता, परंतु ना बेड मिळाला ना उपचार. अखेर त्या वृद्धाने आपल्या म्हाता-या पत्नीच्या कुशीत आज दुपारी बारावाजताच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. आठवडाभरात जिल्ह्यात आॅक्सीजन बेड अभावी मृत्यू होण्याची ही पाचवी घटना आहे. अशा प्रकारे दुर्देवी मृत्यू होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे, परंतु उपचाराअभावी मृत्यू रोखण्यास जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे.