Lockdown मध्ये मागच्या दाराने सर्रास दारूविक्री

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वणी : गेली सव्वा वर्ष कोरोनामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन आहे. या काळात अनेक महिने दारूविक्रीवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे दारूविक्री कमी होऊन एक्साईजच्या महसुलातही घट होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात या निर्बंधातही पोलीस व दंडाधिकारीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून दारू विक्री केली गेली.

अनेक बीअरबार, वाईनशाॅप, देशी दारू दुकाने, बीअर शाॅपी निर्बंधातही मागच्या दाराने चालविल्या गेल्या. तेथील दारूसाठा मोठ्या प्रमाणात व जादा दराने विकला गेला. त्यामुळेच गेल्या वर्षभरात एक्साईजला मिळणारा महसूल घटण्याऐवजी चक्क सव्वादोन कोटी रुपयांनी वाढला आहे. या वाढलेल्या महसुलातच दारूच्या अवैध मार्गाने विक्रीचे पुरावे दडले आहेत.

वर्षभरात विकली गेलेली दारू ही वैधच होती. परंतु ती विकण्याची पद्धत मात्र अवैधरीत्या राबविली गेली. काही भागात दारूविक्रीत घट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्या भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात झाली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या वर्षभर जिल्ह्यात सर्वत्रच दारूची अवैधरीत्या विक्री केली गेली. कारवाई मात्र नाममात्र झाली. तत्कालीन प्रशासनाने कारवाई करतानाही दुजाभाव केला. कुणाला अधिक, तर कुणाला नाममात्र दंड ठोठावण्यात आला.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात बीअरच्या विक्रीमध्ये २४ टक्क्यांनी घट झाली आहे. वर्षभरात १९ लाख ३८ हजार ८२२ लिटर बीअरची विक्री केली गेली.

वर्षभरात एक कोटी ४८ लाख आठ हजार ५८६ लिटर देशी दारूची विक्री केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती साडेसात लाख लिटरने घटली आहे.
विदेशी दारूच्या विक्रीतसुद्धा वर्षभरात पाच टक्क्याने अर्थात पावणेदोन लाख लिटरने घट झाली आहे. विक्री कमी झाल्याने त्यात महसूल कमी मिळाला.