• कोरपना, मुल तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती
• राजुरा-गोवरी-माथरा मार्गावरील वाहतूक बंद
• सुमठाणा-बोडगाव मार्ग बंद
चंद्रपूर : जिल्ह्यात काल पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राजुरा, कोरपना, मुल तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले भरभरून वाहत असून काही ठिकाणी मार्ग बंद झाले आहेत. तर काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे तर राजुरा तालुक्यात भेदोडा येथे दुचाकीसह एक शेतकरी वाहून गेल्याची माहिती आहे.
भेदोडा नाल्यावरून शेतकरी वाहून गेला
राजुरा तालुक्यातील भेदोडा येथील चंदू बिलावार (वय 55 वर्षे) शेतकरी गावाजवळील नाल्यावरून गावाकडे मोटरसायकलने जात होता. भेदोडा नाल्याला पूर असतांनाही त्याने आपली दुचाकी पाण्यात टाकली आणि पुरात दुचाकीसह वाहून गेला, अशी माहिती प्राप्त झाली आहे. राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचली असून शोध घेणे सुरू आहे.
राजुरा-गोवरी-माथरा मार्गावरील वाहतूक बंद
राजुरा शहरालगत असलेल्या रामपूर वस्तीलगत वन विभागाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. यामधूनच सिमेंट व कोळसा माल वाहतुकीसाठी रेल्वे लाईन आहे. दोन दिवसाच्या पावसामुळे याच रेल्वे लाईन च्या दोन्ही बाजूने लांब अंतरावरून जंगलातील व इतर ठिकाणचे पाणी रामपूर वस्तीकडे येऊन घुसल्याने राजुरा-गोवरी माथरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
खामोना पुलावरून पाणी; सुमठाणा-बोडगाव मार्ग बंद
आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान कोरोना तालुक्यातील खामोना जवळील नाल्यावरून ५ फूट वरून पाणी वाहत असल्याने राजुरा-गडचांदूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाहतूक ठप्प झाल्याने पुलाचा दोन्हीकडे वाहनांचा रांगा लागल्या आहे. पोलिसांचा येथे पहारा सुरु आहे. याच मार्गावरील आर्वी गावाच्या नाल्यावरील पुलाला लागून पाणी वाहत आहे.
गोवरी कॉलनी ते कढोली व पोवनी ते कढोली जाणाऱ्या मार्गावरील पुलाला लागून पाणी वाहत आहे. राजुरा-मात्रा, सुमठाणा बोडगाव, राजुरा-सुमठाणा मार्गावरील नाल्यावरील पुलाला लागून पाणी वाहत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली.
राजुरा-गडचांदूर मार्ग बंद
राजुरा-गडचांदूर राज्य महामार्गावरील भवानी नाल्यावर तीन फूट पाणी असल्याने सध्या राजुरा-गडचांदूर मार्ग बंद झाला आहे.कधी नवे ते आज चिल्लावार पेट्रोलपंप पर्यंत नाल्याचे पाणी आल्याने रामपूर परिसरातील काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. वेळीच वाहतूक शिपाई मार्गावर पोहोचल्याने धोकादायक मार्गावरून होणारी वाहतूक थांबली आहे.
मुल मध्ये 25 ते 30 घरात पाणी घुसले
मुल मध्ये रस्ते आणि नाल्या उंच झाल्याने पावसाचे पाणी पुन्हा एकदा घरात शिरले. गुडघाभर पाणी घरात जमा झाल्याने वार्डवासीय जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला. हा फटका मुल मधील वार्ड क्र.9 आणि 10,11 मधील जनतेला बसला.
गुरूवारच्या दिवसभरातील पावसाने मूल मधील विविध ठिकाण च्या सकल व खोलगट भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले. काही रहिवासीकांचे घरात पाणी घुसल्याने सामानाचे नुकसान झाले. मुख्य रस्त्यावर सुद्धा पावसाचे पाणी जमा झाले.