कोरोना योद्ध्यांना बांधली “महापौर राखी”

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी साजरा केला रक्षाबंधन

चंद्रपूर : मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या काळात नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासकीय सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी “महापौर राखी” बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. कोरोनाच्या संकटात सेवा देणाऱ्या योद्ध्यांच्या मनगटात ताकद आणि बळ मिळावे, यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी “महापौर राखी” हा अनोखा उपक्रम राबविला. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शेवाळे यांना राखी बांधली. यावेळी मिठाई आणि संकल्पपूर्ती पुस्तिका भेट दिली.

याप्रसंगी महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, कोरोनाच्या संकट काळात प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. भविष्यातही त्यांच्या हातून सेवा कार्य घडत राहो, त्यांच्या मनगटात आणखी बळ यावे, यासाठी चंद्रपूरकर महिलांच्या वतीने “महापौर राखी” बांधली. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला असा समज करून घेऊ नये, मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे याचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.