डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे नामांकित पुरस्कार जाहीर

• सत्यपाल महाराज यांना जीवन गौरव, विजय देठे यांना सेवार्थ सन्मान
• २ नोव्हेंबरला बिबी येथे दिव्यग्राम महोत्सव
• सत्यपाल महाराजांची जाहीर मुलाखत होणार

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबीचे नामांकित पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार अकोट येथील राष्ट्रीय कृतिशील प्रबोधनकार, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांना व सेवार्थ सन्मान वनहक्क चळवळीतील युवा अग्रणी, सामाजिक कार्यकर्ते विजय देठे यांना जाहीर करण्यात आला.

बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे हे मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्नांवर मागील ३५ वर्षे निशुल्क उपचार करत असून पाच लाखांहून अधिक अस्थिरुग्नांना त्यांनी बरे केले आहेत. ग्रामसभेने त्यांना ‘डाॅक्टर’ ही ऐतिहासिक उपाधी दिली. त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ सदर पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. स्व.सदाशिवराव चटप स्मृतीप्रीत्यर्थ माजी आमदार, शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी सत्यपाल महाराज यांची प्रकट मुलाखत यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते, संपादक संतोष अरसोड व अधिवक्ता दीपक चटप घेतील.

अकोला जिल्ह्यातील अकोट येथील सत्यपाल महाराज यांनी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरीत होवून हातात झाडू व खंजेरी घेवून प्रबोधनाच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. किर्तनाच्या माध्यमातून राज्यातील गावागावात स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, स्त्रीभ्रूनहत्या, शिक्षणाचे महत्त्व, हागणदारीमुक्त गाव याविषयी जागरुकता पसरवली. ते एक कृतिशील व विज्ञानवादी सुधारक आहेत. जिल्ह्यातील आश्वासक सामाजिक कार्यकर्ते शिरूर स्टे.येथील पर्यावरण मित्रचे विजय देठे यांनी गोंडपिंपरीतील पाचगाव गावाला सामुहिक वनहक्क मिळवून देत आदर्श व्यवस्थापनाचे देशात माॅडेल उभे केले. त्यांनी वनहक्कासोबतच रोजगार हमी योजनेतून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. ज्यांना रोजगार मिळाला नाही त्यांना जिल्ह्यात पहिल्यांदाच बेरोजगार भत्ता मिळवून दिला. प्रसिद्धीपासून दूर राहत ते श्वाश्वत कामाने ओळखले जातात.

२०१२ पासून बिबी येथे दिवाळी ही ग्रामस्वच्छता, फटाकेमुक्त व प्रबोधनात्मक दिव्यग्राम महोत्सवाने साजरी होते. यंदाच्या दिव्यग्राम महोत्सव २ नोव्हेंबरला आयोजित कार्यक्रमात माजी आमदार ॲड.वामनराव चटप, डॉ.गिरीधर काळे, सविता काळे, स्वागताध्यक्ष संतोष उपरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे अविनाश पोईनकर, रत्नाकर चटप, गणपत तुम्हाणे, हबीब शेख, इराना तुम्हाणे, संदीप पिंगे, राहूल आसूटकर, सतिश पाचभाई, विठ्ठल अहिरकर, प्रमोद विरुटकर, राकेश बोबडे, कार्तिक मोरे, स्वप्निल झुरमुरे, राजेंद्र सलाम, राजेश खनके, सचिन मडावी, सुरज लेडांगे, विशाल अहिरकर, आकाश चटपल्लीवार, आकाश उरकुडे, महेश नाकाडे, गणपत मडकाम, चंपत तुम्हाणे, संतोष बावणे, समीर शेख, अनिल हिंगाणे, वैभव आमने, मारोती मट्टे, सुरज मडावी, संदिप कोटनाके, महेश राठोड यांनी कळवले आहे.