पोंभुर्णा येथे 20 ऑक्‍सीजन बेडस् उपलब्‍ध होणार; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्‍हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या द़ष्‍टीने जिल्‍हा रूग्‍णालयाला 17 व्‍हेंटीलेटर उपलब्‍ध करून देण्‍या पाठोपाठ माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्‍णालयात स्‍थापित झालेल्‍या कोविड केअर सेंटरला 20 ऑक्‍सीजन बेडस् उपलब्‍ध होणार आहे.

जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी सदर ऑक्‍सीजन बेडस् च्‍या खरेदीसाठी 19 लक्ष रू. च्‍या खर्चाला दि. 22 जानेवारी रोजी प्रशासकीय मान्‍यता प्रदान केली आहे. पोंभुर्णा येथील कोविड केअर सेंटरला 20 ऑक्‍सीजन बेडस् उपलब्‍ध करण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिका-यांकडे केली व त्‍यांचा पाठपुरावा केला. जिल्‍हा वार्षिक योजनेअंतर्गत सदर 20 ऑक्‍सीजन बेडस् च्‍या खरेदीसाठी मंजुरी देण्‍यात आली आहे. पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्‍णालयाची इमारत बांधुन तयार आहे. ही इमारत आवश्‍यक बाबींची पुर्तता करून आरोग्‍य सेवेसाठी जनतेच्‍या सेवेत रूजु करण्‍याबाबत आ. मुनगंटीवार यांचा पाठपुरावा सुरू आहे. नुकतीच त्‍यांनी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकांशी ऑनलाईन बैठकही घेतली. पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्‍णालयात 100 बेडेड कोविड केअर सेंटर सुध्‍दा त्‍यांच्‍या प्रयत्‍नांच्‍या फलस्‍वरूप सुरू करण्‍यात आले आहे.

या आदिवासी बहुल भागातील कोरोनाग्रस्‍त रूग्‍णांना ऑक्‍सीजन बेडस् ची सुविधा उपलब्‍ध व्‍हावी म्‍हणून आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत 20 ऑक्‍सीजन बेडस् ला मंजुरी मिळविल्‍याने या भागातील नागरिकांना मोठी सोय उपलब्‍ध होणार आहे. सदर ऑक्‍सीजन बेडस् 4 ते 5 दिवसात रूग्‍णांच्‍या सेवेत रूजु होणार आहे.