औद्योगीक क्षेत्रातील ऑक्सीजन वापरावर जिल्हा प्रशासनाची मनाई

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• ऑक्सीजनचा वापर फक्त कोविड रुग्णांसाठी करण्याचे निर्देश

चंद्रपूर : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या ऑक्सीजनच्या वितरणावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्बंध लादले असून ऑक्सीजनचा वापर विनापरवानगी औद्योगिक क्षेत्रात करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ यांची जिल्हा ऑक्सीजन नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय ऑक्सीजनचा वापर कोविड रूग्णांखेरीज इतरत्र होत असल्याचे आढळून आल्यास त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

यासंदर्भात कालच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी एम.आय.डी.सी. येथील आदित्य ऑक्सीजन प्लांटला भेट देऊन तेथील ऑक्सीजनचे वितरण जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार केवळ कोविड उपचारासाठी करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी ऑक्सीजनचे किती उत्पादन होते आणि त्याचे वितरण कसे व कुठे कुठे होते याबाबत तपासणीदेखील केली. जिल्ह्यात ऑक्सीजनची उत्पादन क्षमता वाढविण्यात यावी व यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी तहसीलदार निलेश गोंड व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड हे उपस्थित होते.