चंद्रपूर : घुग्घुस शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. मागील काही दिवसात एका पाठोपाठ कोरोना बाधितांच्या मृत्यूने घुग्घुस शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घुग्घुस येथील एंटीजन तथा RTPCR टेस्ट केंद्र असो किंवा राजीव रतन येथील कोविड लसीकरण केंद्र, हे सर्व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांमुळे सुरू करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात एंटीजन व RTPCR टेस्ट केंद्र असल्यामुळे राजीव रतन रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता घुग्घुस शहरात अधिकचे कोविड लसीकरण केंद्र सुरू करणे अत्यावश्यक आहे.
घुग्घुस येथील राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात लसीकरण करण्यासाठी तुंबळ गर्दी होत आहे. शुक्रवार सकाळ पासून लसीकरण सुरु होताच लसीकरणासाठी नागरिकांनी तुंबळ गर्दी केली. एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांना नाईलाजाने या केंद्रावर जावे लागत आहे. मोठी गर्दी होत असल्याने कोविड संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यापासून आता पर्यंत घुग्घुस येथील कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 477 च्या घरात गेली आहे.
राजीव रतन केंद्रीय चिकित्सालय हे घुग्घुस वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी लांब पडते. त्यामुळे अनेक 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी घुग्घुस वस्ती परिसरात एक कोविड लसीकरण केंद्रं जिल्हा प्रशासनाने तात्काळ सुरु करावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सुचनेनुसार घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी जिल्हा प्रशासनास केली आहे.