वणी : लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे रसायन शास्त्र विभाग प्रमुख म्हणून सेवारत असलेल्या डॉ. सुनंदा शशिकांत आस्वले यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधून शोध निबंधांचे वाचन, विविध मान्यताप्राप्त शोध पत्रिकां मध्ये १०० च्यावर शोध निबंधांचे आणि ३ पुस्तकांचेही लेखन, विद्यापीठाच्या विविध समित्यांवर केलेले कार्य, मान्यताप्राप्त संशोधन केंद्र स्वरूपात रसायनशास्त्र विभागात आचार्य पदवीसाठी अनेक विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन, वणी सारख्या सुदूर क्षेत्रात रसायन शास्त्र विषयाच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यात कार्यक्रम अधिकारी म्हणून दिलेले योगदान, विविध संस्थांच्या द्वारे प्राप्त झालेले भारत शिक्षा रतन इ. सन्मान, अशा त्यांच्या विविधांगी कार्याचा विचार करीत विद्यापीठाने त्यांना हा गौरव प्रदान केला आहे.
त्यांचे पती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शशिकांत अस्वले यांना प्राचार्य प्रवर्गातून हा पुरस्कार पूर्वी प्राप्त झाला आहे. अशा स्वरूपात दोघांनाही विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त होणारे हे विद्यापीठाच्या इतिहासातील कदाचित एकमेव दाम्पत्य असावे.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रसाद खानझोडे महाविद्यालयाचे समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचे विद्यार्थी या सगळ्यांच्या द्वारे या वैशिष्ट्यपूर्ण उपलब्धी बद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.