रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा खुर्ची सोडा :
जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा इशारा
चंद्रपूर : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, विकासाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप पदाधिका-याचे जनतेच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सत्ताधा-यांनी शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा खुर्ची खाली करावी, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्त्यातील खड्डयांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत झोपेचे सोंग घेऊन असलेल्या मनपातील भाजप सत्ताधिका-यांना जागे करण्यासाठी मंगळवारी (ता.२४) बागला चौकात भजन आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
तिवारी पुढे म्हणाले, बाबूपेठ, महाकाली कॉलरी, लालपेठ, जुनोना चौक, भिवापूर या परिसरातील नागरिक कामासाठी शहरात ये-जा करताना बागला चौक ते कस्तुरबा चौक या रस्त्याचा वापर करतात. मात्र, या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालविणा-या या परिसरातील नागरिकांना मणक्याचे आजार झाले आहेत. मात्र, याकडे मनपातील सत्ताधा-यांचे दुर्लक्ष होत आहे. जनतेने विश्वास टाकत सत्ता दिली. मात्र सत्ताधा-यांनी विश्वासघात केला. त्यामुळे शहरातील जनतेने आता भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी.
यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतात मनपाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. त्यानंतर रस्त्याने ये-जा करणा-यां वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. भजन मंडळी आणि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भजन सादर करीत निषेध नोंदविला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, सेवादल अध्यक्ष नंदू खनके, श्रीनिवास गोमासे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीताताई अग्रवाल, माजी महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे, ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी उमाकांत धांडे, अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्ष अनुताई दहेगावकर, चंदाताई वैरागडे, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, नगरसेवक पिंकी दीक्षित, माजी नगरसेविका उषाताई धांडे, माजी नगरसेवक राजेश अडूर, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक राजेश रेवल्लीवार, माजी नगरसेवक बापू अन्सारी, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, एनएसयूआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, अशोक गद्दामवार, एकता गुरले, युसूफ चाचा, रवी भिसे, राज यादव, राहुल चौधरी, पप्पू सिद्दीकी, इरफान शेख, राजीव खजांची, नौशाद शेख, विजय धोबे, प्रवीण डाहुले, प्रीतीशा शाह, संदीप सिडाम, मोनू रामटेके, सलीम भाई, कासिफ अली, केतन दुरसेलवार, हाजी शेख, धर्मेंद्र तिवारी, आकाश तिवारी, नीलेश पुगलिया, अनिस राजा, स्वप्नील केळझरकर, मनीष तिवारी, तवंगर खान, सुरेश गोलेवार, रमेश पारनंदी, संगीता मित्तल, चव्हाण ताई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रस्त्याच्या बांधकामाचा ठराव मार्चमध्येच पारित; केवळ प्रसिद्धीसाठी काँग्रेसचे भजन आंदोलन
चंद्रपूर शहरातील विविध रस्त्यांची कामे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून करण्यासाठी महानगर पालिकेच्या चार सदस्यीय समितीने २९ मार्च २०२१ रोजी ठराव पारित केला. ३१ मार्च २०२१ रोजी सदर रस्त्याच्या कामाची फाईल मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली. त्यामुळे येत्या काळात रस्त्याची कामे होणार आहेत. असे असतानाही केवळ राजकीय भावनेतून आणि प्रसिद्धीसाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी खड्डयांविरोधात भजन आंदोलन करण्यात आले, अशी टीका मनपाच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.